प्रतापनगरातील कुंटणखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 01:17 AM2016-09-24T01:17:37+5:302016-09-24T01:17:37+5:30
जयताळा (प्रतापनगर) येथील एका कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी धाड घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेतले.
दोन महिलांसह तिघांना अटक : पीडित तरुणींची सुटका
नागपूर : जयताळा (प्रतापनगर) येथील एका कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी धाड घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्यासह अनेक गरजू महिला-मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुष दलालाला पोलिसांनी अटक केली.
आकाश अशोक जगणे (वय २५, रा. कुंभार ले-आऊट कामठी), रजनी विष्णू नेहारे (वय ४८, रा. सारंग अपार्टमेंट, जयताळा) आणि रंजना भीमराव लांजेवार (वय ५०, रा. कन्हान) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
हे तीनही आरोपी एकमेकांच्या नात्यात लागतात. दोन महिन्यांपासून त्यांनी नेहारेच्या सदनिकेत कुंटणखाना सुरू केला होता. रोज मोठ्या प्रमाणात तेथे ग्राहक यायचे, नवनवीन ग्राहकांची वर्दळ बघून आजूबाजूच्या नागरिकांत कुजबूज सुरू झाली होती. ही माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार शिवाजी गायकवाड यांनी शहानिशा करून घेतली. माहिती पक्की असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाईसाठी सापळा रचला. त्यानुसार, गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास पोलिसांनी जगणे आणि नेहारेकडे देहविक्रय करणाऱ्या मुलींची मागणी करणारे ग्राहक पाठविले. त्यांनी ग्राहकांकडून प्रत्येकी दीड हजार रुपये घेऊन देहविक्रय करणाऱ्या दोन तरुणी तसेच रूम उपलब्ध करून दिल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना संकेत दिले. त्यानुसार, ठाणेदार गायकवाड यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. मुंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक एस. जी. बनसोड हवालदार अविनाश शेरसिंग, महिला शिपाई किरण आणि दीपाली यांनी नेहारेच्या सदनिकेत धाड घातली. यावेळी तेथे दोन तरुणी वेश्याव्यवसाय करताना सापडल्या. त्यांना तसेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या जगणे, नेहारे आणि लांजेवार अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)
तरुणींची सुधारगृहात रवानगी
पैशाचे आमिष दाखवून जगणे, नेहारे आणि लांजेवार हे तिघे ‘त्या’ दोघींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर त्यांच्यावर पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करून त्यांची २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. तर, पीडित तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. पीडित तरुणी आणि कुंटणखाना चालविणाऱ्या महिला नातेवाईक आहेत. पैशासाठी यातील एका महिलेने पवित्र नातेसंबंध बदनाम केले आहे.