भुखंडाच्या वादात यादवची महिलेला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:13+5:302021-02-07T04:08:13+5:30
नागपूर : एमआयडीसीच्या पांडुरंगनगर जयताळा येथील एका भूखंडाच्या वादात खरेदी करणाऱ्या महिलेला धमकी दिल्याच्या प्रकरणात राज्य कामगार विकास महामंडळाचे ...
नागपूर : एमआयडीसीच्या पांडुरंगनगर जयताळा येथील एका भूखंडाच्या वादात खरेदी करणाऱ्या महिलेला धमकी दिल्याच्या प्रकरणात राज्य कामगार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादवविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये मुन्ना यादवचा निकटवर्तीय राजवीर यादव, प्रॉपर्टी डीलर प्रमोद डोंगरे व गणेश यादव यांचा समावेश आहे. फिर्यादी ४० वर्षीय महिला केअर टेकरचे काम करते. महिलेची प्रॉपर्टी डीलर डोंगरेसोबत ओळख होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये डोंगरेने महिलेला त्याचा मित्र सिनू होरो (झारखंड)च्या मालकीचा प्लॉट व घर पांडुरंगनगरात असल्याची माहिती दिली होती. त्याला होरोने पॉवर ऑफ ॲटर्नी दिल्यामुळे या घराचा सौदा डोंगरेने महिलेसोबत १२ लाखात केला होता. महिलेने डोंगरेला ६.२५ लाख रुपये दिले होते. त्यानंतर २५ मे २०२० रोजी डोंगरे आणि होरोने महिलेला प्लॉटचा ताबा दिला. ३० सप्टेंबर २०२० रोजी प्लॉटची रजिस्ट्री करण्याचे त्यांनी ठरविले होते. परंतु डोंगरेने रजिस्ट्री करून दिली नाही. दरम्यान, ते घर डोंगरे आणि राजवीर यादवने विकून टाकले. त्यानंतर महिलेला धमकी देण्यात येत होती. महिलेच्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२१ रोजी दुपारी पंजूने तिला व्हॉट्सॲप कॉल करून मुन्ना यादवने भेटण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. अजनी चौक येथील कार्यालयात पोहोचल्यानंतर महिलेला मुन्ना यादवने ३ लाख रुपये देऊन प्लॉट सोडण्याची धमकी दिली. त्यानंतर एमआयडीसी ठाण्यासमोर १४ जानेवारी २०२१ रोजी डोंगरे, राजवीर आणि गणेश यादव यांनी महिलेस धमकी दिली.
............
ताबा न दिल्यास मारण्याची धमकी
तक्रारकर्त्या महिलेनुसार आरोपी तिला प्लॉटचा ताबा सोडण्यासाठी धमकावत होते. ताबा सोडण्यासाठी केवळ ३ लाख रुपये घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.
...