यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:28 PM2018-12-01T23:28:49+5:302018-12-01T23:29:37+5:30
नागपुरातील नामांकित गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन मित्रांच्या जीवलग मैत्रीची गोष्ट एका सांगितीक मैफिलीत परवा नागपूरकर श्रोत्यांनी अनुभवली. त्या सच्च्या दोस्तीला साऱ्यांनीच सलाम केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील नामांकित गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन मित्रांच्या जीवलग मैत्रीची गोष्ट एका सांगितीक मैफिलीत परवा नागपूरकर श्रोत्यांनी अनुभवली. त्या सच्च्या दोस्तीला साऱ्यांनीच सलाम केला.
विदर्भाचा किशोर कुमार म्हणून ओळखला जाणारा सागर मधुमटके आणि आपल्या वैविध्यपूर्ण गळ्यानी नामांकित असलेला सारंग जोशी, हे दोघेही जीवलग मित्र. या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आणि हेवेदावे असताना त्यांच्यातील मैत्रीची विण अतिशय मजबूत आहे. त्या मैत्रीला सलाम करण्यासाठी प्रवीण कोलते आणि तुषार देशपांडे या दोन मित्रांनी के. डी. इव्हेंट्सच्या माध्यमातून ‘अॅन इव्हीनिंग वूईथ सागर अॅन्ड सारंग’ या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सायंटिफिक सभागृहात केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एमएसईडीसीएलच्या ग्राहक पंचायतच्या सल्लागार अॅड. गौरी चंद्रायण, महावितरणचे मुख्य अभियंता अभय हरणे आणि अॅड. वृशाली प्रधान उपस्थित होते.
मैत्रीला साद घालीत तिची विण अधिक घट्ट करीत सागर आणि सारंगच्या गाण्यांची मैफिल सुरू झाली. आपल्या मित्रांचे कौतुक पाहण्यासाठी समीर पंडित, नंदू गोहाणे, विजय चिवंडे, सोनाली दीक्षित हे नामांकित कलावंतही श्रोत्यांमध्ये होते. या मैफिलीला अधिक रंगतदार करण्यासाठी सागर आणि सारंगच्या गोतावळ्यातील सर्व नामांकित कलावंत व्यासपीठावर होते. सिंथेसायझरवर राजा राठोड, गिटारवर गौरव टांकसाळे, रॉबिन विलियम, तालवाद्य विक्रम जोशी, आॅक्टोपॅडवर राजू ठाकूर, तबल्यावर प्रशांत नागमोते, ढोलकीवर पंकज यादव या कलावंतांसोबत ही मैफिल तब्बल तीन तास रंगली. ‘शिर्डीवाले साईबाबा...’ या गीताद्वारे साईबाबाला वंदन करून हा कारवाँ सुरू झाला. पुढे या दोघांनी खास मैत्रीचे भावबंध उलगडणारे ‘तेरे जैसा यार कहां..., जिंदगी मिल के बितायेंगे, हाल ये दिल गा के सुनायेंगे..., ये दोस्ती हम नही तोडेंगे..., यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी..., सलामत रहे दोस्ताना हमारा...’ अशी सदासर्वकाळ मैत्रीचा कोपरा हळवा करणारी गाणी सादर करून आपल्याच दोस्तीचा परिचय दिला.
याशिवाय ‘बचना ऐ हसिनों लो मै आ गया..., माना हो तुम बेहद हसी..., बाबू समझो ईशारे..., डाकीया डाक लाया..., कभी बेकसी ने मारा..., एक चतुर नार..., यारा हो यारा..., मै हुं डॉन..., चांद मेरा दिल..., क्या मौसम है..., ओम शांती ओम..., यम्मा यम्मा...प्यार हमे किस मोड पे ले आया...’ अशी काही अवखळ, रोमांस, खट्याळ मूडमध्ये नेणारी बहारदार गाणी अतिशय समरसतेने सादर करून सागर आणि सारंग यांनी श्रोत्यांच्या मनाला दिलखुलास आनंद दिला. सभागृहात उपस्थित सर्व रसिकांनी या ‘यारों के यार’ असलेल्या गुणी गायकांच्या स्वरांचा मनमुराद आनंद लुटला. डॉ. मनोज साल्पेकर यांच्या बहारदार निवेदनाने मैफिलीत अधिकच रंगत भरली.