नागपुरात यशवंत मनोहर यांचा रविवारी अमृत महोत्सवी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:03 PM2018-06-01T22:03:13+5:302018-06-01T22:03:27+5:30
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी २६ मार्च रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहे. त्यानिमित्त येत्या ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. यशवंत मनोहर अमृत महोत्सव सोहळा संयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी २६ मार्च रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहे. त्यानिमित्त येत्या ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. यशवंत मनोहर अमृत महोत्सव सोहळा संयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध विचारवंत व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे राहतील. डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि पुणे येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील हे अध्यक्षस्थानी राहतील.
पत्रपरिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम, कार्याध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, सचिव डॉ. प्रकाश खरात, अजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
जनार्दन वाघमारे यांना यशवंत मनोहर पुरस्कार
डॉ. यशवंत मनोहर यांच्या अमृत महेत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी दहा लक्ष रुपये जमा करून त्या निधीतून त्यांच्या नावाने राज्यातील किंवा देशातील परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी डॉ. यशवंत मनोहर पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. हा पहिला पुरस्कार उपेक्षितांचे अंतरंग जाणून आयुष्यभर लेखन करणारे विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांना देण्यात येणार आहे. ३१ हजार रुपये रोख, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ३ जून रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह राष्ट्रभाषा संकुल शंकरनगर चौक येथे देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. यावेळी लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार प्रमुख अतिथी राहतील. डॉ. पी.डी. पाटील अध्यक्षस्थानी राहतील. या निधीतून नागपूर विद्यापीठातून मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी दहा हजारांचा पुरस्कारही देण्यात येणार आहे.