यशवंत स्टेडियमला जागतिक रूप मिळावे : विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:52 AM2018-06-04T10:52:41+5:302018-06-04T10:52:49+5:30
नागपुरात आयोजित अरिजित सिंग लाईव्ह कन्सर्टच्या रोमांचकारी सोहळ््यात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अरिजितच्या जादुई आवाजाचे भरभरून कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपुरात आयोजित अरिजित सिंग लाईव्ह कन्सर्टच्या रोमांचकारी सोहळ््यात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अरिजितच्या जादुई आवाजाचे भरभरून कौतुक केले. अरिजित सिंगचा नागपुरातील कार्यक्रम याअगोदर दोनदा हुकला होता. त्यामुळे या कार्यक्रमांनी नागपूरकरांची इच्छापूर्तीच झाली असून खऱ्या अर्थाने सुरेल स्वप्न साकार झाले असे म्हणता येईल, असे ते म्हणाले. जयंती नगरीच्या प्रकल्पामुळे तीन हजारांहून नागरिकांना हक्काचे व सोयींनी युक्त घर मिळणार आहे. येथे ‘हेलिपॅड’ असावे व नागरिकांच्या सोयीसाठी इस्पितळ असावे असा सल्ला मी मजुमदार यांना दिला असल्याचे दर्डा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यशवंत स्टेडियममध्ये १० हजार गाड्या एकाच वेळी ‘पार्क’ करता येतील, अशी सुविधा निर्माण करण्याचे गडकरी यांना आवाहन केले. शहरात ‘पार्किंग’ची समस्या वाढत आहे. त्यामुळे यशवंत स्टेडियमला पाडून तेथे १० हजार गाड्यांचे एका वेळी ‘पार्किंग’ करण्यासोबत जागतिक पातळीचे मैदान विकसित करायला हवे. नितीन गडकरी हे विकासपुरुष आहेत व त्यांनी मनात आणले तर हे नक्कीच शक्य होईल, असे विजय दर्डा यांनी यावेळी प्रतिपादन केले.
गडकरींची पूर्णवेळ उपस्थिती
नितीन गडकरी यांना गाणे ऐकण्याची आवड आहे व अरिजित सिंगच्या स्वरांना ऐकण्यासाठी ते तसेच विजय दर्डा हे पूर्णवेळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गडकरी यांनी अरिजित सिंगचे कौतुक केले. जयंती नगरीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना घरे मिळाली आहेत. नवीन नागपूरचा हा भाग विकसित होत असून उड्डाणपुलामुळे वर्धा मार्गावर अवघ्या ५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या उपनगराप्रमाणे नागपूरचे उपनगरदेखील विकसित करू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
अखेर संधी मिळालीच
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरिजित सिंगने रसिकांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. नागपुरात याअगोदर येता येता संधी हुकली होती. अखेर या शहरात सादरीकरण करण्याचे सौभाग्य मिळाले ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, असे तो म्हणाला. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार वारे वाहायला लागल्याने समयसूचकता दाखवत त्याने स्टेजजवळील रसिकांना दूर होण्याचे आवाहन केले.