यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 10:59 PM2020-02-05T22:59:44+5:302020-02-05T23:01:43+5:30
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, विदर्भातील डॉ. पराग घोंगे, डॉ. सतीश पावडे, प्रभा गणोरकर, दा.गो. काळे व सुमन नवलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, विदर्भातील डॉ. पराग घोंगे, डॉ. सतीश पावडे, प्रभा गणोरकर, दा.गो. काळे व सुमन नवलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय गटात समीक्षा, वाङ्मयीन संशोधन, सौंदर्यशास्त्र, ललितकला आस्वादपर लेखनासाठी डॉ. पराग घोंगे यांच्या ‘अभिनय चिंतन : भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त’ या ग्रंथासाठी एक लाख रुपये रोख रकमेचा ‘श्री.के. क्षीरसागर पुरस्कार’, प्रथम प्रकाशन गटात ‘आफळ’ या समीक्षा सौंदर्यशास्त्रासाठी दा.गो. काळे यांना ५० हजार रुपये रोख रकमेचा ‘रा.भा. पाटणकर पुरस्कार’, प्रौढ वाङ्मय गटात डॉ. सतीश पावडे यांना ‘दी थिएटर ऑफ दी अॅब्सर्ड’ या तत्त्वज्ञान व मानसशास्त्रीय ग्रंथासाठी एक लाख रुपये रोख असलेला ‘ना.गो. नांदापूरकर पुरस्कार’, प्रभा गणोरकर यांना ‘आशा बगे यांच्या निवडक कथा’ या संपादित ग्रंथासाठी एक लाख रुपये रोख असलेला ‘रा.ना.चव्हाण पुरस्कार’ आणि डॉ. सुमन नवलकर यांना ‘काटेरी मुकुट’ या बालकादंबरीकरिता ५० हजार रुपये रोख असलेला ‘साने गुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील एकूण ३५ साहित्यिकांच्या प्रकाशित ग्रंथांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.