यशवंतराव धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद जपणारे नेते- सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:23 AM2018-07-07T02:23:13+5:302018-07-07T02:23:22+5:30
मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची राजकीय पायाभरणी केली, सहकार वाढविला व ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध केला. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री व अर्थमंत्री पदेही यशस्वीपणे सांभाळली.
नागपूर : मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची राजकीय पायाभरणी केली, सहकार वाढविला व ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध केला. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री व अर्थमंत्री पदेही यशस्वीपणे सांभाळली. ज्यांचा साहित्य, कला, संस्कृतीशी सबंध येईल, अशी माणसे राजकारणात शोधून सापडणार नाहीत. परंतु यशवंतरावांनी राजकारणासोबत महाराष्ट्राचाही साहित्यिक, सांस्कृतिक वारसा समृद्ध केला. त्यांनी धर्मनिरपेक्ष सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दिशेने कायम वाटचाल केली, असे मनोगत ‘लोकमत’चे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने आयोजित यशवंत महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गिरीश गांधी, आमदार हेमंत टकले, प्रा. गणेश चव्हाण, प्रदीप विटाळकर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
द्वादशीवार यांनी यशवंतरावांच्या जीवनचरित्राचे पैलू उलगडले. ते गरिबीत जन्माला आले आणि गरिबीतच मरण पावले. निधन झाले तेव्हा त्यांच्या पासबुकमध्ये ३६ हजार रुपये होते.
ब्राह्मणेत्तर चळवळीत जन्मले तरी विरोधकांविषयी द्वेषभावनेऐवजी प्रत्येकाच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्याची विवेकबुद्धी त्यांच्यात होती. यशवंतरावांनी संधी मिळाली तेव्हा विविध भाषांसह राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लष्करशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.
कवी संमेलनाने सुरुवात : उद््घाटन कार्यक्रमानंतर कवी संमेलनाच्या आयोजनाने या साहित्यिक व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. आमदार हेमंत टकले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कवी संमेलनात प्रा. ज्ञानेश वाकुडकर, लोकनाथ यशवंत, डॉ. सागर खादीवाला, सना पंडित, बन्सी कोठेवार, मनीषा अतुल, डॉ. स्मिता देशपांडे या कवींनी त्यांच्या रचना सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविली.