कौंडण्यपूरच्या पालखीचे २९ मे रोजी प्रयाण
By admin | Published: May 21, 2017 03:21 PM2017-05-21T15:21:03+5:302017-05-21T15:21:03+5:30
या पालखीला पंढरपूर येथे विशेष मान मिळतो. सन १५९४ पासून अखंड सुरू असलेली ही राज्यातील एकमेव प्राचीन पालखी आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : विदर्भाची पंढरी व देवी रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कांैडण्यपूर येथून पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जाणाऱ्या पायदळ दिंडी पालखी सोहळ्याला ४२३ वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे. यंदा ही पालखी २९ मे रोजी प्रयाण करणार आहे. या पालखीला पंढरपूर येथे विशेष मान मिळतो. सन १५९४ पासून अखंड सुरू असलेली ही राज्यातील एकमेव प्राचीन पालखी आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतात, तर कार्तिकी एकादशीला कांैडण्यपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी संस्थानमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी शासकीय महापूजा करतात. यंदा ही पालखी २९ मे रोजी निघणार आहे. यावेळी जगद्गुरू श्री रामानंदाचार्य स्वामी श्रीराम राजेश्वराचार्य महाराज पिठाधीश्वर श्री कमला रुख्मिणी विदर्भ पीठ कौंडण्यपूर तसेच विश्वस्त मंडळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गावागावांत या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते.
एक जून रोजी अमरावती येथे पालखीचे आगमन होताच हजारो भाविकांच्या उपस्थितीत तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात पालखीचे जंगी स्वागत केले जाईल.