यवतमाळ मराठी साहित्य संमेलन : सन्मानापुढे परंपरा नतमस्तक, पण ‘घाई’चा आक्षेप अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:07 AM2018-09-30T00:07:56+5:302018-09-30T00:08:34+5:30
यवतमाळ येथे होऊ घातलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी निवडला जाईल, असे जाहीर केले आहे. तसेही हे प्रतिष्ठेचे पद असल्याने ते सन्मानानेच निवडले जावे, असे एकूणच सारस्वत मंडळीचे मत असल्याने या निर्णयाचे स्वागत झाले आहे. मात्र ही घटनादुरुस्ती २०२० च्या संमेलनाच्या वेळी लागू होईल, अशी अपेक्षा असणाऱ्यांना याचवेळी निर्णय लागू झाल्याने धक्का बसला आहे. एकंदरीत अनेक वर्षांची परंपरा आता मोडित निघणार असल्याने गाडीने रुळ बदलावा तसा खडखडाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. अ. भा. मराठीसाहित्य महामंडळाने या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी निवडला जाईल, असे जाहीर केले आहे. तसेही हे प्रतिष्ठेचे पद असल्याने ते सन्मानानेच निवडले जावे, असे एकूणच सारस्वत मंडळीचे मत असल्याने या निर्णयाचे स्वागत झाले आहे. मात्र ही घटनादुरुस्ती २०२० च्या संमेलनाच्या वेळी लागू होईल, अशी अपेक्षा असणाऱ्यांना याचवेळी निर्णय लागू झाल्याने धक्का बसला आहे. एकंदरीत अनेक वर्षांची परंपरा आता मोडित निघणार असल्याने गाडीने रुळ बदलावा तसा खडखडाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१८७८ पासून असलेल्या साहित्य संमेलनाच्या परंपरेत १९६१ ला अ. भा. मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यानंतर निवडणुकीद्वारे संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची परंपरा सुरू झाली. ही परंपरा लोकशाही पद्धतीप्रमाणे असल्याच्या विचारातून ही पद्धत मान्य करणारा वर्गही आहे. मात्र निवडणुकीमध्ये पक्षांच्या उमेदवारांप्रमाणे प्रचार करणे, एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणे ही बाब बुद्धिजीवी वर्गात गणल्या जाणाऱ्या या साहित्यिकांना मान्य नाही. त्यामुळे बहुतेक साहित्यिकांनी निवडणूक आणि संमेलन अध्यक्ष पदाकडेही पाठ फिरविल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडणूक रद्द करून सन्मानाने अध्यक्ष निवडला जावा, ही गेल्या अनेक वर्षांची मागणी महामंडळाने मान्य केली. त्याप्रमाणे ३० जूनच्या विशेष सभेत निर्णय घेण्यात आला. पुढच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता पाहून ९३ व्या संमेलनापासून लागू करण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र यादरम्यान सर्व घटक संस्थांची संमती प्राप्त झाल्याने याचवेळी ‘इलेक्शनऐवजी सिलेक्शन’ ही घटनादुरुस्ती लागू करण्यात आली. वास्तविक विदर्भ साहित्य संघासह पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संघाने या नव्या पद्धतीला आधीच मान्यता दिली आहे. मात्र मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेकडून संमती न मिळाल्याने या संस्थेचा आक्षेप असल्याचे बोलले जात असले तरी तसा आक्षेप त्यांनीही नोंदविलेला नाही. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे ३० जूनला घटनादुरुस्तीच्या निर्णयानंतर चारही घटक संस्थांना त्याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला. बहुतेक संस्थांनी त्यांची संमती महामंडळाला सादर केली. महामंडळाच्या घटनेच्या कलम १५(२)नुसार विशेष सभेत मंजूर घटनादुरुस्ती मसुद्यासह घटक संस्थांना पाठवावी व संस्थांनी दिलेल्या मुदतीत त्यावर आपली संमती कळवावी.
एखाद्या घटक संस्थेचे पत्र न आल्यास त्यांची संमती आहे, असे गृहित धरावे. या प्रक्रियेचे पालन करूनच महामंडळाने निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर घटक संस्थांसह सहा समाविष्ट संस्थांनाही संमेलन अध्यक्षांची नावे सादर करण्याबाबत पत्रव्यवहार केले असून, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
वास्तविक घटनादुरुस्ती समितीने हा प्रस्ताव दिल्यानंतर मागील वर्षीच हा निर्णय लागू होणे अपेक्षित होते. मात्र सगळ्यांची संमती व्हावी म्हणून निर्णय व्हायला एक वर्ष उशीरच झाला, असे म्हणायला हरकत नाही. मात्र निर्णय झाल्यानंतर तो लागू करणे महामंडळास बंधनकारक आहे. अन्यथा जुन्या घटनेनुसार यवतमाळ संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक घेणे अवैध ठरले असते, असेही जाणकारांचे मत आहे. प्रक्रिया आणि पेच असले तरी यवतमाळला होणारे साहित्य संमेलन हे नव्या प्रक्रियेने होत असल्याने त्याबाबतची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
आम्ही महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आमच्या संस्थेनेच याबाबत पुढाकार घेतला होता. अगोदर कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मान्य केला होता व नंतरच महामंडळाकडे सादर केला होता. निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे अनेक ज्येष्ठ साहित्यिक व महिला साहित्यिक या प्रतिष्ठेच्या पदापासून दूर राहिले. हे सर्व साहित्यिक महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करतात; त्यामुळे त्यांना सन्मानाने पद द्यावे, ही आमची भूमिका आहे. सर्वांच्या संमतीनेच हा निर्णय झाल्याने घाई झाली, असे म्हणता येणार नाही.
मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
निवडणुकीऐवजी संमेलन अध्यक्षाची सर्वसंमतीने निवडीच्या बाजूने आम्ही मत दिले आहे. सर्व घटनेप्रमाणे झाले असल्याने आमची मान्यता आहे. महामंडळाकडून याबाबतचे पत्रव्यवहार आम्हाला झाले आहेत. अध्यक्षपदाची नावे देण्याबाबत अद्याप ठरले नाही. वेळेत आम्ही जाहीर करू.
उषा तांबे, मुंबई मराठी साहित्य संघ
घटना दुरुस्ती लागू करण्यात कोणतीही घाई झालेली नाही. सर्व प्रक्रिया घटनात्मकरीत्या व नियमानुसार , वैध मार्गाने, कायदेशीर सल्ल्यानुसार पूर्ण करूनच हा निर्णय लागू करण्यात आला असून सर्व घटक संस्था सह समाविष्ट व संलग्न संस्थांना अध्यक्षपदासाठी नावे पाठविण्याबाबतही पत्रव्यवहार झाला आहे , काहींची नावे प्राप्तही झाली आहेत. घटनादुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होऊनही त्यानुसार काम केले नाही तरच ते आक्षेपार्ह ठरले असते. ही नवीन प्रक्रिया सर्वांनी मान्य केली असून महामंडळाकडे आतापर्यंत कुठलाही आक्षेप किंवा तक्रार आलेली नाही. उलट सर्वांचा प्रतिसाद मिळाला आहे.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ