तु. वि. गेडाम हे चक्रधर स्वामींचे खरे अनुयायी

By admin | Published: July 11, 2017 01:55 AM2017-07-11T01:55:25+5:302017-07-11T01:55:25+5:30

चक्रधरस्वामी यांनी धर्मनिरपेक्षतेचा, समतेचा विचार मांडला. त्यांनी सामान्य लोकांना धर्माचे तत्त्वज्ञान समजावे म्हणून संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले.

Ye V. Gedam is the true follower of Chakradhar Swamy | तु. वि. गेडाम हे चक्रधर स्वामींचे खरे अनुयायी

तु. वि. गेडाम हे चक्रधर स्वामींचे खरे अनुयायी

Next

भाऊ लोखंडे : गेडाम यांचा ९३ वा अभिष्टचिंतन सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चक्रधरस्वामी यांनी धर्मनिरपेक्षतेचा, समतेचा विचार मांडला. त्यांनी सामान्य लोकांना धर्माचे तत्त्वज्ञान समजावे म्हणून संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी डॉ. तु.वि. गेडाम यांनी महानुभाव साहित्य संमेलनाचा पाया घातला. मराठी साहित्य संमेलन ग्रामीण भागात का होऊ नये, असा सवाल करीत त्यांचे जन्मगाव तळोधी येथे साहित्य संमेलन घेतल्यास सर्व व्यवस्था स्वीकारण्याचा आग्रह त्यांनी धरला. कथित प्रतिष्ठितांना आव्हान देणारे गेडाम हे चक्रधरस्वामींचे खरे अनुयायी होत, असे गौरवपूर्ण मनोगत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी व्यक्त केले.
महानुभाव सेवा संघ व कल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि अ.भा. महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष साहित्य संशोधक व इतिहासतज्ज्ञ डॉ. तु.वि. गेडाम यांच्या ९३ व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ठवरे प्रार्थना सभागृह येथे आयोजित या सोहळ्यात मकरधोकडा महानुभाव पीठाचे प्रमुख आचार्य न्यायंबासबाबा शास्त्री अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी गेडाम यांच्या पत्नी प्रभाताई गेडाम, जिंदा भगत, पुरुषोत्तम ठाकरे, अ‍ॅड. के.आर. शेंडे, केशरताई मेश्राम, छत्रपती शेंडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. सोनपेठकरबाबा, धनराज रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, डॉ. गेडाम यांनी कल्याण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनी अनेकांचे आयुष्य सुधारले. तळोधीसारख्या ग्रामीण भागापर्यंत शैक्षणिक संस्था पोहोचविली. यासोबतच महानुभाव तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महानुभाव संमेलन व साहित्य संमेलनाचे आयोजन केले. महानुभाव तत्त्वज्ञानासोबतच अस्पृश्यता व अनेक विषयांवर ग्रंथसंपदा निर्माण केली. डॉ. आंबेडकरांसमोर अस्पृश्यतेचा विषय मांडला व त्यांच्या विचारांचे सेवाकार्य पुढे चालविले. शासनाच्या अनेक संस्था, समित्यांमध्ये कार्य केले. इतके मोठे कार्य करूनही त्यांनी कृतज्ञता भाव कायम जोपासला. त्यांच्यातील ही कृतज्ञता त्यांना उच्चस्तरापर्यंत नेत असल्याचे विचार डॉ. लोखंडे यांनी व्यक्त केले.
सोहळ्यातील इतर मान्यवरांनी डॉ. गेडाम यांचा ऋषितुल्य कर्मयोगी अशा शब्दात गौरव करीत त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजाचा अमूल्य ठेवा असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष आनंद गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Web Title: Ye V. Gedam is the true follower of Chakradhar Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.