२०३० मध्ये जगभरात १६५ मिलियन टन घनकचरा

By admin | Published: April 12, 2017 01:58 AM2017-04-12T01:58:05+5:302017-04-12T01:58:05+5:30

जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.

In the year 2030, around 165 million tonnes of solid waste worldwide | २०३० मध्ये जगभरात १६५ मिलियन टन घनकचरा

२०३० मध्ये जगभरात १६५ मिलियन टन घनकचरा

Next

अशोक पांडे : घनकचरा व्यवस्थापनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला ‘नीरी’त प्रारंभ
नागपूर : जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. २०३० मध्ये हा जागतिक प्रश्न बनेल व १६५ मिलियन टन घनकचरा निर्माण होईल. याचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखायला हवी, असे मत मोहाली ‘सीआयएबी’चे (सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग) ज्येष्ठ संशोधक डॉ.अशोक पांडे यांनी व्यक्त केले. ‘नीरी’, शासकीय विज्ञान संस्था, शासकीय न्यायसहायक संस्था,‘स्वच्छ नागपूर’ ही स्वयंसेवी संस्था व मोहता महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.
‘विकसनशील देशांत एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावरील या परिषदेचे मुख्य अतिथी म्हणून हाँगकाँग बाप्टिस्ट विद्यापीठाचे संचालक प्रा.जोनाथन वांग, ‘सीएसआयआर’च्या (कौन्सिल आॅफ सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च) भरती व मूल्यांकन मंडळाचे चेअरमन डॉ.सतीश वटे, ‘सीएसआयआर-सीमफर’चे (सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग अ‍ॅन्ड फ्युअल रिसर्च) संचालक डॉ.प्रदीप सिंह, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.रामदार आत्राम, शासकीय न्यायवैद्यक संस्थेचे संचालक डॉ.जयराम खोब्रागडे व आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
जगातील तीन चतुर्थांश कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात येत नाही. ‘ई-वेस्ट’चा प्रश्न तर आणखी गंभीर आहे. भारत तर ‘ई-वेस्ट’साठी ‘डम्पिंग यार्ड’च झाला आहे. त्यामुळेच सर्वसमावेशक धोरण निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा उपक्रमात ‘नीरी’ने नेतृत्व करावे, असे प्रतिपादन अशोक पांडे यांनी केले. प्रा.जोनाथन वांग यांनी जगभरातील घनकचरा व्यवस्थापन प्रणालींवर प्रकाश टाकला. घनकचरा व्यवस्थापनासाठी एकमेकांची नक्कल करण्यापेक्षा आवश्यकतेनुसार धोरणे ठरविली गेली पाहिजेत, असे ते म्हणाले. डॉ.सुनील कुमार यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या दिवशी सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. देश-विदेशातून १०० हून अधिक संशोधक यात सहभागी झाले आहेत.
डॉ.सतीश वटे यांनी यावेळी घनकचरा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचे किती महत्त्व आहे, यावर भाष्य केले. वैज्ञानिकांनी समाजाचे हित लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे. आता संशोधन प्रयोगशाळांमधून प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर नेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ.प्रदीप सिंह यांनी केले. या आंतरराष्ट्रीय संमेलनातून घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील अनेक सकारात्मक बाबी समोर येतील. यातून प्रशासनालादेखील दिशा मिळेल, असा विश्वास डॉ.राकेश कुमार यांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी जागृती आवश्यक असल्याचे मत डॉ. खोब्रागडे यांनी व्यक्त केले. डॉ.आत्राम यांनी या परिषदेचे महत्त्व विषद केले.(प्रतिनिधी)

सहापट वाढणार घनकचरा : निकोलस थेमेलिस
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे संचालक प्रा.निकोलस थेमेलिस यांनी ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून ‘आशियातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. आताच्या स्थितीत १० टक्के घनकचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याला परत उपयोगात आणले जात आहे. मात्र ९० टक्के कचरा ‘डम्पिंग यार्ड’मध्ये पडून राहतो. कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने आशियामध्ये जमीन प्रदूषण वाढत आहे. चीनमध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणारे २०० हून अधिक प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर भारतानेदेखील पुढाकार घ्यायला हवा. देशात चार ते पाच प्रकल्पच असून यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. २०३० पर्यंत आशियातील घनकचरा सहा पटींनी वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

कचरा विलग करण्यासाठी पदवी लागते का ?
यावेळी प्रा.जोनाथन वांग यांनी प्रशासनाच्या धोरणांवरच बोट ठेवले. उगमाच्या ठिकाणीच कचरा विलग झाला तर घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मात्र कचरा विलग होणे शक्य नाही, असा दावा प्रशासनांकडून करण्यात येतो. कचरा विलग करण्यासाठी कुठल्याही पदवीची आवश्यकता असते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: In the year 2030, around 165 million tonnes of solid waste worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.