यंदा गणेशोत्सवात चारचाकीची विक्री ‘टॉप गीअर’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:10 AM2021-09-15T04:10:54+5:302021-09-15T04:10:54+5:30
नागपूर : कोरोनामुळे मंदावलेली वाहन व्यवसायातील उलाढाल आता पुन्हा सुरळीत होऊ लागल्याचे गणेशोत्सवानिमित्त झालेल्या वाहन खरेदीतून स्पष्ट झाले आहे. ...
नागपूर : कोरोनामुळे मंदावलेली वाहन व्यवसायातील उलाढाल आता पुन्हा सुरळीत होऊ लागल्याचे गणेशोत्सवानिमित्त झालेल्या वाहन खरेदीतून स्पष्ट झाले आहे. बाजारपेठेतील आर्थिक मंदीचे वातावरण निवळून सध्या चारचाकी वाहन खरेदीचा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. शाळा आणि कॉलेज बंद असल्यामुळे दुचाकी विक्रीवर परिणाम झाला आहे. दसऱ्यापर्यंत विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली.
अनलॉकनंतर गेल्या काही महिन्यांपासून वाहन विक्री धीम्या गतीने सुरू होती; पण सणांच्या दिवसांत वाहन खरेदी वाढेल, अशी व्यावसायिकांना अपेक्षा होती. सध्या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खास ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. कोरोना काळात टॅक्सी, खासगी बस, ऑटोसारख्या वाहनांचा होणारा प्रवासदेखील कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी ऑटो, बस आणि टॅक्सीच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वाहनांच्या विक्रीची टक्केवारी कमीच आहे. या तुलनेत चारचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यात बजेट गाड्यांची मागणी जास्त असल्याची प्रतिक्रिया ऑटोमोबाइल डीलर्सनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
चारचाकींची विक्री वाढली
चारचाकीमध्ये मारुती सुझुकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. कंपनीकडून गाड्यांच्या पुरवठा कमी असला तरीही आवडत्या गाडीसाठी ग्राहकांची नोंदणी सुरू आहे. मारुती सुझुकीच्या गाड्या खरेदीकडे लोकांचा कल नेहमीच जास्त असतो. सध्या काही गाड्यांसाठी वेटिंग वाढले आहे.
-विशाल बरबटे, संचालक, आर्य कार्स
कारला प्रचंड प्रतिसाद
दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांची विक्री वाढली आहे. कंपनीच्या चेतक ब्रॅण्डला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शाळा व कॉलेज सुरू न झाल्याने दुचाकींची विक्री वाढली नाही; पण टोयोटा गाड्यांची विक्री चांगली आहे. गणेशोत्सवात पहिल्या दिवशी २५ गाड्यांची डिलिव्हरी दिली. पुढे प्रतिसाद मिळेल.
-उमेश पाटणी, संचालक, पाटणी ऑटोमोबाइल
कार मार्केट उच्चांकावर
अनलॉकनंतर कार मार्केट उच्चांकावर आहे. ग्राहकांची खरेदी वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत एमजी हेक्टर गाडीची ६० टक्के जास्त बुकिंग आहे. त्यामुळे उत्साह संचारला आहे. गणेशोत्सवात पहिल्या दिवशी २६ गाड्यांची डिलिव्हरी दिली. नोंदणी सुरू असून, नवरात्रीपर्यंत सर्वाधिक गाड्यांची विक्री होईल.
-अक्षित नांगिया, संचालक, नांगिया कार्स प्रा.लि.
चारचाकी वाहने खरेदीला गर्दी
कार मार्केटमध्ये ह्युंदाईच्या गाड्यांना मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक ७० कार ग्राहकांना दिल्या. कंपनीकडे अनेक पर्याय आहेत. नवीन दाखल आय २० एनलाइन गाडीला पसंती आहे. शिवाय अन्य मॉडेलची विक्री वाढली आहे. काही कारसाठी वेटिंग वाढली आहे.
-अनुज पांडे, संचालक, इरोज ह्युंदाई