यंदा गुजरातचे तीळ आणि उत्तर प्रदेशचा गूळ करणार तोंड गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:17 AM2018-01-01T10:17:04+5:302018-01-01T10:17:34+5:30
तीळ आणि गुळाच्या किमतीत थोडी दरवाढ झाल्यामुळे तीळसंक्रातीत तिळगुळाचा स्वाद चाखणाऱ्यांना यावर्षी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : तीळ आणि गुळाच्या किमतीत थोडी दरवाढ झाल्यामुळे तीळसंक्रातीत तिळगुळाचा स्वाद चाखणाऱ्यांना यावर्षी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. गेल्यावर्षी किरकोळमध्ये पांढऱ्या तिळाचे भाव ९० ते ११० रुपये आणि लाल तीळ १२० ते १३० रुपये होते. यंदा भावात १० टक्के वाढ झाल्यामुळे पांढरे तीळ १२० रुपये आणि लाल तिळाचे भाव १४० रुपयांवर पोहोचले आहेत.
किराणा बाजाराची पाहणी केली असता प्रत्येकाच्या दुकानात काऊंटरवर तीळ आणि गूळ दिसून आले. विशेषत: तिळगुळाच्या विविध व्यंजनांचे शौकिन इतवारी किराणा ओळ आणि रेवडी ओळीत गर्दी करीत आहेत. किराणा ओळीत तिळाचे लाडू, पापडी, शेंगदाणा, सुका मेवा, गूळ आदीं ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
किराणा व्यावसायिक सलीम कुरेशी यांनी सांगितले की, नागपूरकरांसह बाहेर गावातील लोक तीळ, गूळ आणि अन्य सामग्री खरेदी करण्यासाठी नागपुरात येतात. सामग्रीची विविधता आणि किफायत दरांमुळे लोकांची या बाजारपेठांना पसंती आहे. नागपुरात तीळ गुजरातेतून येत आहे. तसे पाहता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन होते. पण गुजरात येथील तिळाला लोकांची पसंती आहे.
विभिन्न राज्यातील गुळाची रेलचेल
सर्वाधिक विक्रीचा गुलाबी रंगाचा गूळ उत्तर प्रदेशातून येत असून मध्य प्रदेशातील गुळापेक्षा याला लोकांची जास्त पसंती आहे. उत्तर प्रदेशातील बट्टी गूळ ४० रुपये किलो आहे तर कोल्हापूरचा गूळ एक किलो वजनात आहे. त्याला पसंती कमी आहे. यामध्ये सेंद्रीय गूळ ६० रुपये आणि बिगर-सेंद्रीय गूळ ५० रुपये किलो आहे. याशिवाय काही दुकानांमध्ये लाल रंगाचा गोड गूळ विक्रीस उपलब्ध आहे.
निरोगी आरोग्यासाठी गूळ आणि तिळाचे सेवन अत्यंत आवश्यक आहे. थंडीच्या मोसमात तिळगुळाचा स्वाद लोकांना जास्त आकर्षित करणारा आहे. किराणा व्यावसायिकाने सांगितले की, जबलपूर, इंदूर येथे सर्वाधिक विकणाऱ्या गजकची नागपुरात फार कमी विक्री होते. लोक तिळगूळ खरेदी करून लाडू बनविणे पसंत करतात. संक्रांत आणि गणेशचतुर्थी सणात ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ हे वाक्य सर्वत्र ऐकायला मिळते. संक्रांतीसाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे.