यंदा आठच दिवसांचा असेल नवरात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 08:12 PM2021-09-28T20:12:45+5:302021-09-28T20:14:11+5:30
Nagpur News शक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजे नवरात्रोत्सवास ७ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होईल. यंदा नवरात्र आठ दिवसांचे असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजे नवरात्रोत्सवास ७ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होईल. यंदा नवरात्र आठ दिवसांचे असेल. ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थीच्या तिथीला क्षय असल्याने यंदा आठ दिवस मातेच्या शक्तिरूपाची उपासना केली जाईल. (This year Navratri festival will be for eight days only)
कोरोना प्रोटोकॉलनुसार यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला देवस्थाने लागली आहेत. अश्विन मासातील शुक्लपक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल. प्रतिपदेला घटस्थापनेपासूनच अनुष्ठानांना सुरुवात होईल, अशी माहिती पं. उमेश तिवारी यांनी दिली.
अभिजित मुहूर्तावर घटस्थापना
शास्त्रानुसार कलश सुख-समृद्धी, वैभव व मंगल अपेक्षांचे प्रतीक असते. प्रतिपदेला रात्री ९.१२ वाजतापर्यंत चित्रा नक्षत्र आणि रात्री १.३८ वाजतापर्यंत वैधृती योग असेल. या दोन्ही काळाचे सुरुवातीचे दोन चरण वगळता घटस्थापना केली जाऊ शकते. अभिजित मुहूर्त सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४६ पर्यंतचा श्रेष्ठ मुहूर्त आहे. महाअष्टमी १३ ऑक्टोबर व महानवमी १४ ऑक्टोबरला आहे. १५ ऑक्टोबरला विजयादशमी साजरी होईल. पंचांगानुसार यंदा चतुर्थीला क्षय असल्याने नवरात्र ८ दिवस असेल. तृतीया ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४९ वाजतापर्यंत असेल तर १० ऑक्टोबरला चतुर्थी पहाटे ४.५५ वाजतापर्यंत असेल. सूर्योदयाच्या वेळी चतुर्थी नसल्याने, ही तिथी क्षयाची असेल.
...............