यंदा अभियांत्रिकीची ‘सुपरफास्ट’ प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:20+5:302020-12-09T04:07:20+5:30
प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’मुळे लांबलेल्या अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ९ डिसेंबरपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात ...
प्रभाव लोकमतचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे लांबलेल्या अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ९ डिसेंबरपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार असून, महिनाभरात प्रक्रिया आटोपून वर्गदेखील सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ अर्ज भरण्यासाठी केवळ आठवडाभराचाच अवधी मिळणार आहे. मागील वर्षीपर्यंत हीच प्रक्रिया सव्वा महिन्याहून अधिक काळ चालायची. या प्रक्रियेला उशीर होत असल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची बाब ‘लोकमत’ने मांडली होती.
‘कोरोना’मुळे ‘एमएचटीसीईटी’ला उशीर झाला. मात्र निकाल लागल्यावरदेखील यासंदर्भात काहीच हालचाल होत नव्हती. इतर राज्यांमधील प्रवेशप्रक्रिया सुरूदेखील झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले होते. अखेर राज्य सीईटी सेलतर्फे मंगळवारी वेळापत्रक घोषित करण्यात आले. बुधवार ९ डिसेंबरपासूनच अर्ज भरता येणार असून, १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येतील. विद्यार्थ्यांना अर्जनिश्चिती व कागदपत्रांची पडताळणी ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच करायची आहे. ‘कॅप’च्या दोन प्रवेशफेऱ्या राहणार आहेत. तर ४ जानेवारीपासून महाविद्यालयात शैक्षणिक वर्गांना सुरुवात होईल.
अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलासा
प्रवेशप्रक्रिया घोषित झाल्यामुळे नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. नागपूर विभागात ४७ महाविद्यालये असून, १८ हजार २४० जागा आहेत. ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांना आर्थिक भार सहन करावा लागला. याशिवाय शिष्यवृत्तीदेखील अडल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली होती. आता प्रवेशप्रक्रिया होणार असल्यामुळे महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असे आहे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज दाखल करणे - ९ ते १५ डिसेंबर
कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी - ९ ते १६ डिसेंबर
तात्पुरती गुणवत्ता यादी- १८ डिसेंबर
आक्षेप- १९ ते २० डिसेंबर
अंतिम गुणवत्ता यादी - २२ डिसेंबर
पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे- २३ ते २५ डिसेंबर
तात्पुरती प्रवेशयादी - २८ डिसेंबर
प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश- २९ ते ३१ डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी- १ जानेवारी २०२१
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे-२ ते ४ जानेवारी २०२१
तात्पुरती प्रवेशयादी - ६ जानेवारी २०२१
प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश- ७ ते ९ जानेवारी २०२१
वर्गांना सुरुवात- ४ जानेवारी २०२१