यंदाही अतिथींविना होणार संघाचा विजयादशमी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 08:22 PM2021-10-08T20:22:08+5:302021-10-08T20:26:08+5:30
Nagpur News कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदादेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सवाच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदादेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सवाच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे रेशीमबाग मैदानात आयोजन न करता स्मृतिमंदिर परिसरात १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता कार्यक्रम होईल. यंदा मर्यादित संख्येत स्वयंसेवकांची उपस्थिती राहणार असून, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण होणार आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी अतिथींना निमंत्रण दिल्याशिवायच संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे.
संघासाठी विजयादशमी उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. संघ प्रमुखांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. यात संघाच्या भावी योजनांचे संकेतदेखील मिळतात. दरवर्षी हजारो स्वयंसेवक, व्हीव्हीआयपी नेते व नागरिक या उत्सवाला उपस्थित असतात. मागील काही वर्षांपासून संघाच्या कार्यक्रमांमध्ये विविध विचारधारेच्या व्यक्ती दिसून येत असून, विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींकडेदेखील सर्वांचे लक्ष असते. मात्र कोरोनाची स्थिती पाहता यंदादेखील प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अतिथींविनाच हा कार्यक्रम होणार आहे.
कोरोनाचे सावट असल्याने संघाने कार्यक्रमाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृतिमंदिर परिसरात निवडक स्वयंसेवकांना प्रवेश देण्यात येणार आहे. यात घोषपथकाचादेखील समावेश असेल. सरसंघचालकांचे भाषण ऑनलाईन प्रसारित करण्यात येणार आहे.
लहान गटांमध्ये कार्यक्रम होणार
दरम्यान, शाखा व नगरनिहाय विजयादशमी उत्सव लहान लहान गटांमध्ये घेण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. गटांमध्ये कार्यक्रम घेत असताना संख्या मर्यादित असावी. तसेच सरसंघचालकांचे ‘ऑनलाईन’ भाषण ऐकत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशी सूचनादेखील देण्यात आली आहे.