यंदाची होळी ‘चायनीज’ मुक्त; ‘कोरोना’ची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:30 PM2020-03-05T20:30:30+5:302020-03-05T20:31:39+5:30
‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘चायनीज’ सामानावर बंदी घालण्यासाठी दरवर्षी अनेक संघटनांकडून आवाहन करण्यात येते, परंतु त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो. परंतु यंदा स्वस्त माल असूनदेखील ‘चायना मेड’ला मागणी कमी असल्याचे चित्र आहे.
‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे.
‘लोकमत’ने इतवारीतील व्यापाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. नागपुरात यंदा ‘चायनीज’ सामानच नाही. सर्व माल दिल्लीहून मागविण्यात आला आहे. त्यामुळे होळी ‘चायनीज’ मुक्त होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
होळी, दिवाळीसह विविध सणांच्या वेळी ग्राहकांनी चीनमधील मालाचा बहिष्कार करावा हा आमचा प्रयत्न असतो व त्यासंदर्भात जनजागृतीदेखील करतो. परंतु या वर्षी त्यात ‘कोरोना’मुळे यश मिळाले आहे. यामुळे भारतीय मालाची मागणी वाढली असून ती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट आहे. यंदा जो व्यवसाय होईल त्याचा फायदा भारतीय उत्पादक व विक्रेत्यांना मिळेल, असे मत सामाजिक कार्यकर्ता गुड्डू टक्कामोरे यांनी व्यक्त केले.
मागील ३ ते ४ वर्षांपासून दिल्लीत ‘चायनीज’ मालाप्रमाणेच माल तयार होत आहे. सुरुवातीला त्या मालात दर्जा व ‘फिनिशिंग’मध्ये फरक असायचा. परंतु आता त्यात खूप सुधारणा झाली आहे. दरदेखील कमी आहे. त्यामुळे यंदा पिचकारी, रंगाचा ९५ टक्के माल दिल्लीतून आला आहे. रंग व गुलालाचा बहुतांश माल हा उत्तरप्रदेशमधील हाथरस येथून येतो, अशी माहिती विक्रेते शशांक जैन यांनी दिली.