यंदा तिळावर संक्रात ; लाडू होणार महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:44 AM2017-11-30T00:44:18+5:302017-11-30T00:47:06+5:30
यावर्षी मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तिळाचे पीक कमी असल्यामुळे तीळसंक्रांतीत लाडू महाग होणार आहे. ग्राहकांकडून मागणी नसतानाही एक महिन्यापूर्वी ९० रुपयांत मिळणारे तीळ आवक कमी असल्याच्या वृत्ताने १२५ रुपयांवर पोहोचले आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : यावर्षी मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तिळाचे पीक कमी असल्यामुळे तीळसंक्रांतीत लाडू महाग होणार आहे. ग्राहकांकडून मागणी नसतानाही एक महिन्यापूर्वी ९० रुपयांत मिळणारे तीळ आवक कमी असल्याच्या वृत्ताने १२५ रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी पांढऱ्या तिळाचे भाव ९० रुपयांवर स्थिर होते.
गेल्या वर्षी तीळ उत्पादक राज्यांमध्ये विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे तीळसंक्रांतीत भाव ८० ते ९० रुपयांदरम्यान होते. आवक जास्त झाल्यामुळे भाव फारसे वाढले नाहीत. पण यावर्षी तीळ उत्पादक राज्यात पावसामुळे पीक खराब झाले आहे. याशिवाय सर्वाधिक तीळ उत्पादन राज्य गुजरातमधून आवक फारच कमी आहे. तसेच विदेशातही उत्पादन कमी झाल्यामुळे भारतातून मागणी वाढली आहे. निर्यातीसाठी निविदा काढण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे निर्यातीत वाढ होणार आहे. तसेच भाववाढ होण्याच्या शक्यतेने मोठे विक्रेते आतापासूनच साठा करीत आहेत. त्याचाही परिणाम भाववाढीवर होत आहे.
पूर्वीच्या तुलनेत आता तीळ स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. चवीसाठी भाज्यांमध्ये थोडं तीळ टाकण्याची प्रथा वाढली आहे. त्यामुळे पांढरे आणि लाल तिळाची वर्षभर विक्री होते. लाल तिळात प्रथिने आणि तेलाचे प्रमाण जास्त असते. खाण्यास पौष्टिक असल्यामुळे विदर्भात संक्रांतीला लाल तिळाला जास्त मागणी असते. सध्या पांढरे आणि लाल तिळाचे भाव सारखेच आहेत. संक्रांतीला दीड महिन्याचा अवधी असल्यामुळे भाववाढीची शक्यता जास्त असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.