नागपूरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:02+5:302021-09-22T04:09:02+5:30
- वादळी वाऱ्यासह वीज व अतिवृष्टीची शक्यता - नद्या धोक्याच्या पातळीजवळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरसह सर्वच जिल्ह्यांत ...
- वादळी वाऱ्यासह वीज व अतिवृष्टीची शक्यता
- नद्या धोक्याच्या पातळीजवळ
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरसह सर्वच जिल्ह्यांत मागील २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. वडगाव आणि नांद या दोन्ही धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने वणा नदीला पूर आला आहे. यामुळे प्रशासनाने या नदीकाठावरील गावकऱ्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत विदर्भात नागपूरसह सर्वच जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, पुढील तीन दिवस पश्चिम विदर्भासाठीही येलो अलर्ट आहे.
अतिवृष्टीमुळे मंगळवारी सकाळी वडगाव धरणाचे ३ दरवाजे व नांद धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नागपूर, उमरेड या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यामुळे या भागातून येणारे पाणी थेट या दोन्ही धरणक्षेत्रात जमा होत असल्याने ही दोन्ही धरणे पूर्णत: भरली आहेत.
हवामान विभागाने २१ ते २४ सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पुढील २४ तास येलो अलर्ट दिला असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीज व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
....
...तर आणीबाणीची स्थिती
वडगाव आणि नांदचे दरवाजे उघडल्याने वणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. सध्या कोणताही धोका नसला तरी मुसळधार पाऊस झाल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्य धोक्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
...
धरणे पूर्णत्वाकडे
मागील चार दिवसांतील पावसामुळे धरणांची पातळी बरीच वाढली आहे. नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह ८६.३७ टक्के, तर बाघ शिरपूर धरणही ८३.९८ टक्के भरले आहे. अमरावती विभागातील उर्ध्व वर्धा, काटेपूर्णा, अरुणावती ही धरणे ९९ टक्क्यांच्या जवळपास भरली असल्याने १०० टक्के भरल्यावर केव्हाही गेट उघडावे लागू शकतात, अशी स्थिती आहे. बेंबळा, वणा ही धरणेही ९५ टक्क्यांवर आली आहेत. यामुळे गावकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
...
पाऊस (दु. २ वाजेपर्यंत)
वर्धा : २८.५ मिमी
नागपूर : ३० मिमी
भंडारा : ३३.७ मिमी
गोंदिया : १० मिमी
चंद्रपूर : ३९.२ मिमी
गडचिरोली : २०.१ मिमी
सरासरी : २७.६ मिमी
...
धरणातील पाणीसाठा
नागपूर विभाग
पेंच तोतलाडोह : ८६.३७
इटियाडोह : ७१.८१
बाघ शिरपूर : ८३.९८
गोसे खुर्द : ६२.१२
इरई : ७४.०९
अमरावती विभाग
उर्ध्व वर्धा : ९८.२०
बेंबळा : ९३.३८
अरुणावती : ९८.८३
काटेपूर्णा : ९९.४७
वणा : ९५.५५
पेनटाकळी : ५५.८९
खडकपूर्णा : ८९.७२
...
वैनगंगा, बाघ धोक्याच्या पातळीवर
जिल्हा : नदी : ठिकाण : धोक्याची पातळी : आजची पातळी
(पातळी मीटरमध्ये)
गोंदिया : बाघ : रजेगाव काठी : २८० : २८१.३०
भंडारा : वैनगंगा : कारधापूल : २४५ : २४४.१०
भंडारा : वैनगंगा : पवनी : २२६.७४ : २२२.२०
नागपूर : कन्हान : माथनी : २६३.७२ : २५१.९८
गोंदिया : वैनगंगा : देवरी : २७७.३० : २७०.६०
गोंदिया : बावनथडी : महालगाव : २६३.५० : २५८.२०
वर्धा : वेणा : हिंगणघाट : २१२.२४ : २०३.२७
चंद्रपूर : वैनगंगा : वाघुली बुटी : २१२.३१ : २०५.९२
गडचिरोली : वैनगंगा : वडसा : २१५.२० : २५७.८७
...