नागपुरात २८ एप्रिलपर्यंत ‘यलो अलर्ट’; शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन
By आनंद डेकाटे | Published: April 24, 2023 07:01 PM2023-04-24T19:01:45+5:302023-04-24T19:02:13+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये २८ एप्रिल पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे.
आनंद डेकाटे
नागपूर : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये २८ एप्रिल पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. तथापि २५ एप्रिलला ऑरेंज अलर्ट दिलेला असून या दिवशी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी वादळीवारा, वीज गर्जना व गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे, तसेच गोठ्या मध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथील ०७१२-२५६२६६८ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.