येस बँक-अवंता घोटाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:11 AM2021-08-12T04:11:12+5:302021-08-12T04:11:12+5:30
राणा कपूर यांना लाच देणाऱ्या गौतम थापर यांच्याशी संबंधाचा संशय लोकमत न्यूज नेटवक नागपूर : गेल्या बुधवारी दिल्लीत ईडीने ...
राणा कपूर यांना लाच देणाऱ्या गौतम थापर यांच्याशी संबंधाचा संशय
लोकमत न्यूज नेटवक
नागपूर : गेल्या बुधवारी दिल्लीत ईडीने अटक केलेले अवंता समूहाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम थापर यांच्याशी संबंधित येस बँक घोटाळा प्रकरणात मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने नागपूरमधील सीए अश्विन माणकेश्वर यांचे घर व कार्यालयावर छापे टाकले. या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या कारागृहात असलेले येस बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ३०७ कोटींची लाच दिल्याचा व त्याबदल्यात एकोणीसशे कोटी रुपये कर्ज उचलल्याचा आरोप गौतम थापर यांच्यावर आहे. अवंता समूह व सीजी पॉवर अॅण्ड ट्रेड सोल्युशनने विविध सरकारी व खासगी बँकांकडून कर्ज घेऊन किमान अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक केली व या रकमा अन्यत्र वळविण्यात आल्या, असा तपास यंत्रणांना संशय आहे.
गौतम थापर यांच्या प्रकरणाचा तपास ईडी तर राणा कपूर यांच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. कपूर यांनी दिल्लीत बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत बंगला व इतर माध्यमातून थापर यांच्याकडून लाच घेतली व त्यांची कर्जे मंजूर केली. गेल्या मंगळवारी रात्री प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) कायद्याखाली ईडीने गौतम थापर यांना ताब्यात घेतले. ते सध्या दहा दिवसांच्या ईडी कोठडीत आहेत. या प्रकरणात एक्टान ग्लोबल प्रा. लि. या कंपनीचा सहभाग आढळून आला असून, सीए अश्विन माणकेश्वर हे त्या कंपनीचे संचालक आहेत. त्यांचे धरमपेठ येथील कार्यालय तसेच रामदास पेठेतील निवासस्थानी मंगळवारी ईडीने छापे टाकले.
--------------
चौकट
राणा कपूरच्या चौकशीची
सीबीआयला पुन्हा परवानगी
मुंबई - येस बँक घोटाळ्यातील अवंता समूहाच्या भूमिकेचा अधिक सखोल तपास करण्यासाठी सध्या कारागृहात असलेले राणा कपूर यांना पुन्हा अटक करण्याची मागणी करणारा सीबीआयचा अर्ज येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. त्यामुळे येस बँकेच्या घोटाळ्यातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. अवंता समूहाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम थापर यांना अटक केल्यानंतर राणा कपूर यांची पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने त्यांना पुन्हा अटक करण्याची मागणी करणारा अर्ज शुक्रवारी सीबीआयने विशेष न्यायालयासमोर केला होता.