'होय, मी लहानपणी संघ स्वयंसेवक होतो' मुख्यमंत्री शिंदे यांची हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 06:18 PM2022-12-29T18:18:46+5:302022-12-29T18:19:37+5:30
Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते.
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. यावेळी शिंदे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शनदेखील घेतले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही संघस्थानावरील पहिलीच भेट आहे. तसेच अनेक वर्षांनंतर भाजपेतर मुख्यमंत्री संघस्थानी आले हे विशेष.
सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री तेथे पोहोचले. यावेळी संघ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी त्यांना संघकार्य व सेवाप्रकल्पाची माहिती दिली. रेशीमबागेत आ. प्रसाद लाड, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके हेदेखील उपस्थित होते.
यापूर्वी २७ डिसेंबर रोजी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवन परिसरात आले होते. त्या दिवशी भाजप आमदारांसोबत शिंदे गटाचे आमदारही येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्या दिवशी फक्त भाजप आमदार संघ कार्यालयात आले होते. त्या दिवशीचे उपक्रम फक्त भाजप आमदारांसाठी होता. शिंदे कधी येणार याबाबत उत्सुकता लागली होती.
- रेशीमबाग हे प्रेरणा व स्फूर्तिस्थान
रेशीमबागचा हा परिसर प्रेरणास्थान व स्फूर्तिस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. बालपणी मी संघाच्या शाखेत गेलो होतो. इथे आल्यावर समाधान आहे. येथे येऊन मला कोणताही संदेश द्यायचा नाही. यात कोणताही राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्री बनल्यानंतर मला इथे आल्यानंतर नवा अनुभव मिळाला आहे. शिवसेना-भाजप सोबत आहोत. त्यामुळे नवीन संदेश देण्याचा प्रश्न येतच नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.