होय, मी लहानपणी संघ स्वयंसेवक होतो: मुख्यमंत्री शिंदे; रेशीमबागेला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:06 AM2022-12-30T06:06:52+5:302022-12-30T06:08:06+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. यावेळी शिंदे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी त्यांना संघकार्य व सेवाप्रकल्पाची माहिती दिली. आ. प्रसाद लाड, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके हेदेखील उपस्थित होते.
रेशीमबाग हे प्रेरणा व स्फूर्तिस्थान
रेशीमबागचा हा परिसर प्रेरणास्थान व स्फूर्तिस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. बालपणी मी संघाच्या शाखेत गेलो होतो. येथे येऊन मला कोणताही संदेश द्यायचा नाही. यात कोणताही राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्री बनल्यानंतर मला इथे आल्यानंतर नवा अनुभव मिळाला आहे. शिवसेना-भाजप सोबत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दीक्षाभूमीला भेट
- मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दीक्षाभूमीलाही भेट देत डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
- दीक्षाभूमी ही पवित्र भूमी असून, पर्यटन क्षेत्रासोबतच तीर्थक्षेत्राचाही ‘अ’ वर्ग दर्जा आहे. येथील विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"