आता नागपुरातही थांबणार यशवंतपूर- दिल्ली दुरंतो एक्स्प्रेस
By नरेश डोंगरे | Published: August 22, 2023 10:28 PM2023-08-22T22:28:57+5:302023-08-22T22:29:09+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाने विविध मार्गाने धावणाऱ्या १८ वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांना कल्याण, होटगी, कोपरगाव, कान्हेगाव आणि नागपूर स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : मध्य रेल्वेने आता यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरंतो एक्स्प्रेसला नागपुरातही थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही गाडी नागपुरात थांबत नव्हती, हे विशेष!
दक्षिणेतील एक मोठे आणि महत्त्वाचे रेल्वेस्थानक म्हणून यशवंतपूर स्थानक ओळखले जाते. येथून देशाच्या अनेक भागात रेल्वेेगाड्या जातात. यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरंतो एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. यशवंतपूरहून नियमित रेल्वेमार्गे नागपूर विदर्भात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली तरी या गाडीचा थांबा नसल्याने प्रवाशांना दुसरी गाडी शोधावी लागत असे.
मध्य रेल्वे प्रशासनाने विविध मार्गाने धावणाऱ्या १८ वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांना कल्याण, होटगी, कोपरगाव, कान्हेगाव आणि नागपूर स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १० रेल्वेगाड्या कल्याण स्थानकावर तर नागपूरसह उर्वरित प्रत्येक रेल्वे स्थानकावर दोन - दोन गाड्यांना सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, आता २६ ऑगस्टपासून सुटणारी गाडी क्रमांक १२२१३ यशवंतपूर - दिल्ली सराय रोहिला दुरंतो एक्स्प्रेस दुपारी ४:१५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि ५ मिनिटांच्या थांब्यानंतर ४:२० वाजता दिल्लीकडे रवाना होईल. दिल्लीहून येणारी गाडी क्रमांक १२२१४ दुपारी १:२५ ला नागपूर स्थानकात येईल आणि १:३० वाजता यशवंतपूरकडे रवाना होईल.
राजधानीत जाणाऱ्या प्रवाशांची सोय
नागपूर विदर्भातील प्रवासी वेगवेगळ्या कारणामुळे रोज मोठ्या संख्येत दिल्लीला जातात आणि परत येतात. यात राजकीय नेते अन् कार्यकर्तेच नव्हे तर पर्यटक आणि व्यापाऱ्यांचाही, खास करून कापड व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश आहे. या गाडीमुळे त्यांची चांगली सोय झाली आहे.