निकालांचा ‘येवले पॅटर्न’ : उत्तम प्रशासक म्हणून प्रमोद येवले यांचा नावलौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:01 AM2019-07-16T11:01:09+5:302019-07-16T11:03:46+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यामुळे विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यामुळे विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळत असताना डॉ.येवले यांनी परीक्षा प्रणालीला ‘सुपरफास्ट’ बनविले. निकालांचा ‘येवले पॅटर्न’ राज्यभरातील विद्यापीठांनी अवलंबला, हे विशेष. डॉ.प्रमोद येवले यांची एक उत्तम प्रशासक व तंत्रज्ञानाची जाण असणारे अधिकारी म्हणून ओळख आहे.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा डोलारा कोलमडला असताना डॉ.येवले यांनी जून २०१५ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाची सूत्रे हातात घेतली. सर्वप्रथम निकालांची गाडी त्यानी रुळावर आणली. त्यांच्याच पुढाकारातून अर्ज भरण्यापासून ते प्रश्नपत्रिकांची ‘डिलिव्हरी’, अनेक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल या सर्व बाबी ‘ऑनलाईन’च करण्यात झाल्या आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनदेखील ‘ऑनस्क्रीन’ पद्धतीने सुरू झाले आहे. यामुळे निकालांचा वेग वाढला. अगदी राज्यातील व राज्याबाहेरील इतर विद्यापीठांनी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा अभ्यासदेखील केला व डॉ.येवले यांचे मार्गदर्शन घेतले.
‘पीएचडी’ प्रक्रिया केली कडक
नागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’ करणे अतिशय सोपे असते, असा एक सर्वसाधारण समज होता. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार नागपूर विद्यापीठातील नियमदेखील कडक करण्यात आले. नोंदणीसाठी अनिवार्य असलेली ‘पेट’ कठीण करण्यात आली. त्यामुळे चाळणी प्रक्रिया सुरू झाली व ‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबली. सोबतच ‘कोर्सवर्क’चीदेखील प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी सुरू झाली असून संशोधनाचा दर्जा उंचावला आहे.
संस्कृत विद्यापीठालाही दिली गती
डॉ. प्रमोद येवले यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणूनदेखील जबाबदारी सांभाळली होती. अवघ्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी तेथील परीक्षा प्रणालीतदेखील अनेक सकारात्मक बदल केले. तेथील परीक्षा विभाग एकाच ठिकाणी स्थानांतरित केला. शिवाय संस्कृत अभ्यासक्रमांचे मूल्यांकनदेखील ‘ऑनस्क्रीन’ होण्यास सुरुवात झाली.
‘फार्मसी’ क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर ओळख
डॉ.प्रमोद येवले यांना शिक्षक म्हणून ३४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. यातील १५ वर्षे त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्यादेखील सांभाळल्या. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या ५४ शोधपत्रिका प्रकाशित झाल्या. तर त्यांच्या नावावर चार पेटंट आहेत. तीन पुस्तकेदेखील त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९ संशोधकांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली. नागपूर विद्यापीठाच्या ‘फार्मसी’ विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते व व्यवस्थापन परिषद, विधीसभेचेदेखील सदस्य होते. मागील महिन्यातच त्यांचे ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’चे सदस्य म्हणून नामनिर्देशन झाले. विशेष म्हणजे डॉ.येवले हे राज्याच्या मागासवर्गीय आयोगाचेदेखील सदस्य आहेत. ‘असोसिएशन ऑफ फार्मास्युटिक टीचर्स ऑफ इंडिया’चे ते अध्यक्ष होते तर ‘इंडियन सोसायटी ऑफ फार्मकोग्नॉसी’चे उपाध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली.