‘योग’ पूर !- गडकरींसह हजारो नागपूरकरांनी केली योगसाधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 02:48 AM2016-06-22T02:48:01+5:302016-06-22T02:48:01+5:30
योग ही एक साधना आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, निरोगी जीवनाबरोबरच मन:शांती व आत्मबळ मिळते,
योगसाधनेतून शांती व आत्मबळ मिळते : गडकरी
नागपूर : योग ही एक साधना आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, निरोगी जीवनाबरोबरच मन:शांती व आत्मबळ मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.
महानगरपालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, एनसीसी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, मैत्री परिवार, श्रीरामचंद्र मिशन, पतंजली योगपीठ, आर्य ओक लिव्हिंग, गायत्री परिवार, क्रीडा भारती, सहजयोग ध्यान केंद्र व नागपूर जिल्हा योग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा विश्वयोग दिन म्हणून यशवंत स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते.व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, नागो गाणार, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, यशपाल आर्य, प्रदिप काटेकर, गोपाल बोरा आदी व्यासपीठावर होते.
निरोगी जीवन व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग साधना जीवनात अतिशय महत्त्वाची असून या योग साधनेला देशात व जगात मान्यता मिळाली आहे. योगाचा प्रचार व प्रसाराचे काम साधकांद्वारे योग्य प्रकारे सुरू असून जास्तीत जास्त लोक या योग साधनेशी जुळतील. यामुळे लोकांना मोठ्या प्रकारे मन:शांती मिळू शकते, असेही गडकरी म्हणाले.