उद्यानातील गोंगाट निषेधार्थ युवक काँग्रेसचा नागपूर मनपापुढे योगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 09:49 PM2018-01-24T21:49:34+5:302018-01-24T21:56:20+5:30
महापालिका प्रशासनाने महापौरांना अंधारात ठेवून उद्यानात स्पीकरवरून जाहिरातींचा गोंगाट निर्माण केला आहे. हा प्रकार तात्काळ बंद करावा. यासाठी बुधवारी नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात व पूर्व नागपूरचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे व निखिल वांढरे यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या बगीच्यात योगा व मॉर्निंग वॉक करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसभराचा ताणतणाव घालण्यासाठी नागरिक उद्यानातील शांत वातावणात सकाळ-संध्याकाळ व्यायाम करतात. परंतु आता महापालिका प्रशासनाने महापौरांना अंधारात ठेवून उद्यानात स्पीकरवरून जाहिरातींचा गोंगाट निर्माण केला आहे. हा प्रकार तात्काळ बंद करावा. यासाठी बुधवारी नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात व पूर्व नागपूरचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे व निखिल वांढरे यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या बगीच्यात योगा व मॉर्निंग वॉक करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
उद्यानामध्ये स्पीकरवरून जाहिरातींचा गोंगाट करून शांतता भंग करण्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. याची दखल घेत युवक काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली. महापालिकेचे विविध आर्थिक स्रोत असतानाही उद्यानात जाहिरात करून पैसे कमविण्याचा जावईशोध लावला. उद्यानातील समस्यांकडे लक्ष न देता जाहिरातबाजी करून ध्वनिप्रदूषण करीत आहे. पैशाच्या लोभापायी महापालिकेने उद्यानात जाहिरात करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप बंटी शेळके यांनी यावेळी केला.
जाहिरातीच्या माध्यमातून उद्याने खासगी कंत्राटदारांच्या ताब्यात देण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.
उद्यानात जाहिरातबाजी झाली तर नागरिकांनी शुद्ध हवा घेण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी कुठे जावे. त्यापेक्षा नागरिकांना सुविधा पुरवा व नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू नका. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील सुपर अॅडव्हर्टाईज कंपनीला देण्यात आलेला जाहिरातीचा कंत्राट रद्द करावा, अशी मागणी बंटी शेळके यांनी केली.
शेळके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार यांच्याशी चर्चा केली असता, याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. उद्यान निरीक्षकांकडून त्यांनी माहिती घेतली. प्रत्येक उद्यानात जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर स्थायी समितीचा हा ठराव रद्द करू, असे आश्वासन महापौरांनी दिल्याची माहिती शेळके यांनी दिली.
आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव हसमुख सागलानी, नावेद शेख, जयसिंह चव्हाण, राजेंद्र ठाकरे, वसीम शेख, फरदीन खान, तुषार मदने, गुड्डू भाई, रिजवान खान, फजलउर कुरेशी, शेख रियाज, संजय बालानी, राहुल खांडेकर,नीलेश देशभ्रतार, निखिल वानखेडे, बाबू खान,रजत खोब्रागडे, सुरेश कदम,हेमंत कातुरे, पूजक मदने, रवींद्र उईके, अप्पू उईके, सम्यक खोब्रागडे, हर्षल बहादुरे, नितीन गुरव, मन मेश्राम, इरफान शेख, शुभम वांढरे आदींचा सहभाग होता.