योगशास्त्राचा स्वीकार साऱ्या जगाने केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 08:06 PM2017-11-18T20:06:33+5:302017-11-18T20:12:15+5:30
योगशास्त्राच्या प्राचीन परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य महान असून, निरामय जीवनासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज योगशास्त्राचा स्वीकार साऱ्या जगाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : योगशास्त्राच्या प्राचीन परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य महान असून, निरामय जीवनासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज योगशास्त्राचा स्वीकार साऱ्या जगाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रामनगर संघ मैदान येथे जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार अजय संचेती, आमदार डॉ. परिणय फुके, ब्रह्मस्थानंदजी महाराज, मंडळाचे अध्यक्ष सुनील सिर्सीकर, कार्यवाह राम खांडवे, मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. योगमूर्ती या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनार्दनस्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योगशास्त्र व योगाभ्यास ही प्राचीन विद्या असून ती आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. योगशास्त्राला वैज्ञानिक अधिष्ठान लाभले असून, योगमहर्षी पतंजली यांनी योगशास्त्र सूत्रबद्ध केले व विकसित केले. योग ही जीवनपद्धती, संस्कार असून योगाभ्यासामुळे व्यक्तीला शारीरिक व आत्मिक समाधान लाभते. आंतरिक ऊर्जा प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला जगभरातून प्रतिसाद मिळाला व जगभर योगदिन साजरा करण्यात येतो. भिन्न संस्कृती व परंपरा असलेल्या देशातही योगशास्त्राचा अवलंब करण्यात येत आहे. योग ही शाश्वत व्यायाम व चिकित्सापद्धती असल्याचा स्वीकार प्रगत राष्ट्रांनीही केला आहे. योगशास्त्र जगभर पोहचविण्यात व हजारो योगशिक्षक घडविण्यात जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे मोठे योगदान आहे. जनार्दनस्वामी व योगाभ्यासी मंडळासारख्या संस्थांना योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नक्कीच पाठबळ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
अखिल भारतीय त्रिदिवसीय योग संमेलनात योगशास्त्रासंदर्भातील विविध व्याख्याने, चर्चासत्रे व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह राम खांडवे यांनी आभार मानले.