रेशीमबाग मैदानावर पतंजलीतर्फे योग : आबालवृद्धांचा उत्साही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 09:56 PM2019-06-21T21:56:07+5:302019-06-21T21:59:19+5:30
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पतंजली योग समिती, नागपूरच्यावतीने रेशीमबाग मैदानावर योग प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला पुरुष, अबालवृद्धांनी योगासने करून हा दिवस उत्साहात साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पतंजलीयोग समिती, नागपूरच्यावतीने रेशीमबाग मैदानावर योग प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला पुरुष, अबालवृद्धांनी योगासने करून हा दिवस उत्साहात साजरा केला.
भारतासह जगभरात योग दिवस शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. नागपूर शहरातही अनेक संस्था, संघटना व प्रशासकीय कार्यालयामध्ये योग शिबिराचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला. बालकांपासून प्रौढ आणि ज्येष्ठांनी कुठे सामूहिक तर कुठे वैयक्तिकरीतीने सकाळी योगासने केली. पतंजली योग समितीने रेशीमबाग मैदानावर योग शिबिराचे आयोजन केले होते. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुकावार, वैशाली सुधाकर कोहळे, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती समीता चकोले, मनपाचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप काटेकर, जिल्हा प्रभारी ऊर्मिला ज्वारकर, डॉ. जिवेश पंचभाई, छाजुराम शर्मा, दीपक येवले, रितू जरगर, दत्तू चौधरी तसेच ज्येष्ठ योगाचार्य विठ्ठलराव जिभकाटे यांच्या उपस्थित योगासने शिबिराला सुरुवात करण्यात आली. यानिमित्त पतंजलीचे योगसाधक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधकांनी योगासने करण्यासाठी आवश्यक साहित्य सोबत आणले होते. नागरिकांनी विविध आसने यावेळी केली. यादरम्यान मुलांच्या चमूने संगीतावर योगाचे मनमोहक प्रात्याक्षिक करून सर्वांची मने जिंकली. संचालन प्रीती केवलरामानी यांनी केले. वंदे मातरम गायनासह शिबिराचा समारोप झाला.
९१ वर्षांच्या विठ्ठलरावांनी साधला योग
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रेशीमबाग मैदानावर आयोजित योग शिबिरात सर्वांचे लक्ष वेधले ते ९१ वर्षांचे योगाचार्य योगसाधक विठ्ठलराव जिभकाटे यांनी. या वयात त्यांनी चपलखपणे योगाची आसने केली. जिभकाटे यांचा आयुष्याचा योगप्रवास हा विलक्षण आहे. २००१ साली वयाच्या ७३ व्या वर्षी नागपूर विद्यापीठातून योगशास्त्रात आचार्य पदवी घेणारे ते पहिले व्यक्ती आहेत. दहावीची परीक्षा चार वेळा नापास झालेल्या विठ्ठलरावांनी पाचव्या प्रयत्नात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना कृषी विभागात नोकरी मिळाली. यादरम्यान १९७५ साली वयाच्या ४६ व्या वर्षी बीए आणि १९९२ साली एमएची पदवी मिळविली. यादरम्यान त्यांचा योगगुरू जनार्दनस्वामी यांच्याशी संपर्क आला आणि त्यांचे आयुष्य योगमय झाले. स्वामीजींसोबत त्यांनी २८ वर्षे घालविली आहेत. त्यानंतर आपले आयुष्य त्यांनी योग प्रचारासाठी समर्पित केले. नोकरी सांभाळून त्यांनी खेडोपाडी जाऊन योग शिबिरे घेतली व प्रशिक्षण दिले. योग विषयावर त्यांनी २५ ते ३० पुस्तकांचे लेखनही केले. महाराष्ट्र शासनाने त्यांना छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले व सोबत योग प्रचारक म्हणून नियुक्तीही केली. १० वर्षे त्यांनी योगप्रचारक म्हणून शहरात, गावोगावी जाऊन प्रचार केला. आज वयाची नव्वदी पार केलेले विठ्ठलराव योग प्रचारासाठी धडपडत असतात.