कारागृहात योगसाधना

By admin | Published: June 22, 2015 02:41 AM2015-06-22T02:41:39+5:302015-06-22T02:41:39+5:30

जवळपास प्रत्येकाच्याच जीवनात संघर्ष असतो. मात्र, योगसाधनेतून असूया, द्वेषावर मात करून संघर्ष टाळता येतो. आंतरिक शक्तीला योगामुळे चालना मिळते.

Yoga in prison | कारागृहात योगसाधना

कारागृहात योगसाधना

Next

योगसाधनेतून जीवन सुसह्य करा: मुख्यमंत्र्यांचा कैद्यांना हितोपदेश
नागपूर : जवळपास प्रत्येकाच्याच जीवनात संघर्ष असतो. मात्र, योगसाधनेतून असूया, द्वेषावर मात करून संघर्ष टाळता येतो. आंतरिक शक्तीला योगामुळे चालना मिळते. चांगले विचार आत्मसात करण्याची सवय लागते आणि जीवनात परिवर्तन घडवता येते. त्यामुळे योगसाधना करून जीवन सुसह्य करा, असा हितोपदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना दिला.
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून कारागृह प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकरराव देशमुख, योगगुरू स्वामी हार्दिक, राज्य कारागृह प्रशासनाच्या प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर, उपमहानिरीक्षक स्वाती साठे तसेच कारागृह अधीक्षक योगेश देसाई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या आयोजन प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघातील १७७ देशांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे योग ही भारतीय संस्कृती जगभर पोहचली आहे. मात्र, आज आंतरराष्ट्रीय योगदिन आहे म्हणून एक दिवस योगा करून विसरून जायचे, असे होऊ नये.
योगसाधना आयुष्यातील दैनंदिनी झाली पाहिजे.आपण योगसाधक आहात, कारागृहात राहून तुम्ही योग शिक्षक व्हा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी कैद्यांना दिला. (प्रतिनिधी)
सरकार भरेल हप्ता
जनधन योजनेंतर्गत प्रातिनिधिक रूपात पाच कैद्यांना बँक आॅफ महाराष्ट्रचे पासबुक देण्यात आले. या योजनेची कारागृह प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना देतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेत सहभागी करून घेण्यात आलेल्या कैद्यांच्या विम्याचा हप्ता सरकार भरेल, असे स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांसमोर ७३ कैद्यांनी शिस्तबद्ध योगासने करून दाखवली. त्यांना योगा आणि सुदर्शनक्रियेचे धडे देणारे स्वामी हार्दिक यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. तर, कैद्यांनीही ‘रोजच करू योगा’ असा संकल्प मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवला. सकाळी ८ ते ९.३० असे तब्बल दीड तास मुख्यमंत्री कारागृहात होते. मुख्यमंत्र्यांनी कारागृहातील उत्पादित वस्तूंच्या ‘स्टॉल’ला भेट दिली. येथे चटई, ज्वेलरी बॉक्स आणि अन्य उत्पादने बघून येथील उत्पादन प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा मानस व्यक्त केला.
चांदणेंनी जिंकले
शेवटी अभिनेता प्रशांत दामले यांनी ‘सांगा कसे जगायचे, कण्हत कण्हत की, गाणे म्हणत’ हे गीत गात योगाचे महत्त्व पटवून दिले. राज्यातील ५० कारागृह आणि ९ मध्यवर्ती कारागृहात आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी आभारप्रदर्शन करताना दिली. वैशिष्ट्यपूर्ण संचालन करून आर. एस. चांदणे (तुरुंगाधिकारी, वाशीम) यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा मिळवली.

Web Title: Yoga in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.