योगामुळे निरोगी आरोग्य व विचारशक्ती वाढते : राम खांडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:51 AM2019-11-20T00:51:51+5:302019-11-20T00:52:52+5:30
राम खांडवे म्हणाले, योग फक्त शरीराबद्दल नसतो, ते जगण्याचे साधन आहे. त्याद्वारे माणूस सुजाणतेच्या क्षेत्रात जाऊ शकतो आणि स्वत: अस्तित्वासह एकता प्राप्त करू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्राच्या शाखेत सकाळी ७ ते ८ पर्यंत घेण्यात येणाऱ्या मोफत योगा वर्गाचा पाचवा वर्धापनदिन केंद्रात साजरा करण्यात आला.
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सचिव राम खांडवे आणि चिटणवीस केंद्राचे विश्वस्त विलास काळे कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. संजय अरोरा यांनी खांडवे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, तर शालिनी अरोरा यांनी विलास काळे यांना सन्मानित केले.
राम खांडवे म्हणाले, योग फक्त शरीराबद्दल नसतो, ते जगण्याचे साधन आहे. त्याद्वारे माणूस सुजाणतेच्या क्षेत्रात जाऊ शकतो आणि स्वत: अस्तित्वासह एकता प्राप्त करू शकतो. त्यामुळे मनुष्याला विचार करण्यावर आणि स्वार्थी वागण्यावर मर्यादा येते. हाच आनंद जनार्दन स्वामींना जनसामान्यांना द्यायचा होता. म्हणूनच जनार्दन स्वामींनी योगाभ्यास मंडळाच्या माध्यमातून १९५१ पासून योगा वर्ग सुरू केले.
विलास काळे म्हणाले, चिटणवीस सेंटरमध्ये प्रत्येक दिवस अशा निस्वार्थी कृत्याने सुरुवात होत असल्याबद्दल आनंद आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये दिवसभर सकारात्मकता बाळगण्यास मदत होते. स्वत:चे अनुभव कथन करताना त्यांनी आतापर्यंत दरदिवशी योग करीत असल्याचे सांगितले.
डॉ. संजय अरोरा म्हणाले, १५ नोव्हेंबर २०१४ चिटणवीस सेंटरमध्ये मोफत योगा वर्गाला सुरुवात झाली. आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त साधकांनी लाभ घेतला आहे. यावेळी साधकांनी स्वत:चे अनुभव कथन केले. ताणतणाव कमी झाल्याचे सांगितले. सकाळच्या सत्रामुळे शांतता आणि ऊर्जा वाढली आहे.
प्रारंभ संगीता मंत्री यांनी राम खांडवे आणि प्रेरणा चांडक यांनी विलास काळे यांची ओळख करून दिली. प्रवीण अग्रवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन चेतना सूचक यांनी केले तर कल्पना शुक्ला यांनी आभार मानले. निरोगी आरोग्यासाठी मोफत योगा वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.