योग विज्ञान ही जनतेची चळवळ व्हावी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:38+5:302021-06-22T04:06:38+5:30
योगासह मल्लखांब व शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय योग विज्ञान, प्राणायाम, आयुर्वेद व नैसर्गिक उपचार ...
योगासह मल्लखांब व शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय योग विज्ञान, प्राणायाम, आयुर्वेद व नैसर्गिक उपचार यात प्रचंड ताकद आहे. आवश्यक आहे ती योग्य सादरीकरणाची. योग प्राणायाम, आयुर्वेदांचे योग्य आणि प्रभावी सादरीकरण होऊन ते विश्वव्यापी व्हावे व योग ही जनतेची चळवळ व्हावी, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते-महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एका आभासी कार्यक्रमांतर्गत ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते संवाद साधत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व डॉ. हंसा या उपस्थित होत्या. तत्पूर्वी सकाळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नागपूर सर्कल व दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात योग दिनाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गडकरी यांनी स्वत: योगाचे प्रात्यक्षिके केली. याप्रसंगी गडकरी म्हणाले, योग आमची संस्कृती परंपरा आहे. योग विज्ञान हे प्रत्यक्ष जगणे महत्त्वाचे आहे. व्यायाम, योगासने, प्राणायाम हे सातत्याने सुरू ठेवले तर त्याचा चांगला फायदा होतो. माझा स्वत:चा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे उपनिदेशक गौरी मराठे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर सर्कलच्या क्षेत्रीय निदेशक दिनी भट्टाचार्य साहू, अधीक्षक पुरातत्त्वविद् के. रेड्डी, जुने उच्च न्यायालय भवन, नागपूरचे प्रभारी एम. आंगाईतकर प्रामुख्याने उपस्थित होते.
योगनंतर दक्षिण मध्य मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या दरम्यान नागपुरातील कलावंतांनी मल्लखांब व शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकेही सादर केली. मल्लखांब डॉ. संभाजी भोसले व त्यांची चमू यांनी तर राहुल धार्मिक व त्यांच्या चमूने शिवकालीन युद्धकला सादर केली. केंद्राचे वरिष्ठ अधिकारी दीपक पाटील यांनी आभार मानले.