नागपुरातील मुलगी देतेय देश-विदेशात योगाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:40 PM2019-06-21T12:40:38+5:302019-06-21T12:41:44+5:30
योग ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक शांती मिळते. त्यामुळे योगशास्त्रात पीएच.डी. करून नागपुरातील उदयनगर परिसरातील रहिवासी तनु वर्मा यांनी योगाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : योग ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक शांती मिळते. त्यामुळे योगशास्त्रात पीएच.डी. करून नागपुरातील उदयनगर परिसरातील रहिवासी तनु वर्मा यांनी योगाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू केले. भारताची संस्कृती असलेल्या योगाची माहिती विदेशातील नागरिकांना व्हावी यासाठी जपान, श्रीलंका, चीन, जर्मनी, रशिया, फिनलँड या देशात योगाचे धडे देऊन भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचे मोलाचे कार्य त्या करीत आहेत.
डॉ. तनु वर्मा असे या मुलीचे नाव आहे. त्यांच्यावर लहानपणापासून आध्यात्मिक संस्कार झाले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती आणि मनाची शांती मिळत असल्यामुळे त्या योगाकडे वळल्या. त्यांनी देव संस्कृती विश्व विद्यालय हरिद्वार येथून ह्युमन कॉन्शसनेस अँड योगिक सायंस हा कोर्स करून त्याच विषयात पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर नागपुरात योगा धरनेंद्र मल्टीपरपज चॅरिटेबल सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता विकास प्रशिक्षण, कराटे, योगा, मेडिटेशन, तबला, हार्मोनियम, गिटार, मंत्र, यज्ञ शिकविण्याचे कार्य केले. नागपुरात लॉयन्स क्लब, गायत्री परिवार, शिवशक्ती फाऊंडेशन आणि जेसीआय या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी योग शिबिरांचे आयोजन केले. योग ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे भारताच्या संस्कृतीची ओळख जगभरात व्हावी यासाठी त्यांनी विदेशात योग प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी श्रीलंका, चीन, जपान, जर्मनी, रशिया, फिनलँड या देशात योग प्रशिक्षण दिले आहे. जपानमध्ये त्यांची ट्रॅडिशनल योग इन्स्टिट्युट ही संस्था आहे. या संस्थेत त्यांचे विद्यार्थी तेथील नागरिकांना योगाचे धडे देतात. विदेशात योग प्रशिक्षण दिल्यानंतर आता नागपुरात विविध ठिकाणी योग प्रशिक्षण वर्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची संस्कृती असलेल्या योगाचा विदेशात प्रचार-प्रसार करण्याचे त्यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.