‘योग’ योगसाधनेचा !
By Admin | Published: June 21, 2015 02:54 AM2015-06-21T02:54:39+5:302015-06-21T02:54:39+5:30
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिवस’ म्हणून जाहीर केला आहे.
नागपूर : संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी सामूहिक योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका आणि जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यशवंत स्टेडियम येथे सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यशवंत स्टेडिमवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील तर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी मुख्य अतिथी राहतील. यासोबतच राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, खा. विजय दर्डा, खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, मनपा विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त एस.पी. यादव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे आदी उपस्थित होते.
शाळांमध्येही होणार योग दिन साजरा
रविवार सुटीचा दिवस असला तरी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी २१ जून रोजी सकाळी ७ ते ८ या वेळातच उपस्थित राहावे आणि ७.३५ पर्यंत तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रात्यक्षिके करून घ्यावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जारी केले आहेत.
वारांगनाही करणार योग
इंडियन रेड क्रॉस सोसायटीने गंगाजमुना येथील वारांगनांसाठी दुपारी १२ ते १ या वेळात योगसाधना शिबिर आयोजित केले आहे. यात वारांगनाही योगाची प्रात्यक्षिके करतील.