योगेंद्र यादव साधणार शेतकऱ्यांशी संवाद
By admin | Published: June 22, 2015 02:42 AM2015-06-22T02:42:36+5:302015-06-22T02:42:36+5:30
आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले योगेंद्र यादव यांनी देशभरात ‘स्वराज अभियान’ सुरू केले आहे.
‘विदर्भ किसान संवाद’चे आयोजन : ‘आप’चे नाराज कार्यकर्ते होणार सहभागी
नागपूर : आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले योगेंद्र यादव यांनी देशभरात ‘स्वराज अभियान’ सुरू केले आहे. याअंतर्गतच ४ जुलै रोजी नागपुरात ‘विदर्भ किसान संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. विदर्भातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार असून ‘आप’ च्या धोरणांमुळे नाराज असलेले अनेक कार्यकर्तेदेखील येण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षांतर्गत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केला होता. ‘आप’मधून हकालपट्टी झाल्यानंतर या दोघांनी ‘स्वराज अभियान’सुरू केले.
‘आप’चे अनेक कार्यकर्ते यादव यांच्यासोबत आले. त्यानंतर देशभरात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेश, बंगाल, आसाम, हरियाणा,जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, या राज्यात हजारोंच्या उपस्थितीत ‘स्वराज संवाद’ चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘स्वराज अभियान’ ने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘जय किसान आंदोलन’ सुरू केले आहे.
४ जुलै रोजी शंकरनगर येथील साई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्यानंतर योगेंद्र यादव हैदराबादकडे रवाना होणार आहेत. यावेळी भूमी अधिग्रहण कायदा, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्यांच्या शासनाकडून अपेक्षा, प्रत्यक्ष भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा या मुद्यांवर योगेंद्र यादव शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.(प्रतिनिधी)
नाराज कार्यकर्ते अभियानासोबत
लोकसभा निवडणुकांमध्ये नागपुरात ‘आप’सोबत कार्यकर्त्यांची फौज होती. परंतु त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील पक्षांतर्गत मतभेदांचे पडसाद येथेदेखील उमटले. एकीकडे ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दुसरीकडे योगेंद्र यादव-प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ पक्षात दोन गट पडले. यादव यांचे समर्थक असलेले काही कार्यकर्ते अद्यापही ‘आप’मध्ये असून तेदेखील ‘स्वराज अभियान’मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. ‘फेसबुक’ व ‘टष्ट्वीटर’वरदेखील या कार्यक्रमाबाबत प्रसार करण्यात येत आहे.