होम आयसोलेशन आहात, प्रोटीनयुक्त आहार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 10:53 AM2020-08-26T10:53:53+5:302020-08-26T10:54:22+5:30
होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनी प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास प्रकृती सुधारण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची काळजी घेतलेली असतानाही कोविड-१९ची लागण झालेले अनेक रुग्ण आहेत. यामुळे शंका कुशंकांना स्थान न देता, या आजाराची भीती न बाळगता आयुष्यात आलेले एक नवीन आव्हान म्हणून त्याला स्वीकारण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनी प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास प्रकृती सुधारण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लक्षणे नसलेल्या किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या ५,६६३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये म्हणजे गृह अलगीकरणात आहेत. परंतु ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि कोणतीही लक्षणे न दिसणाºया रुग्णांना जर इतर दीर्घकालीन स्वरूपाचे आजार असतील तर त्यांनी होम क्वारंटाईनचा आग्रह धरू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय, रुग्णाच्या घरी आवश्यक त्या सुविधा, म्हणजे वेगळी खोली, स्वतंत्र टॉयलेट असतील तरच हा पर्याय निवडावा, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-आहारात निष्काळजीपणा नको
डॉक्टरांनुसार, रुग्णाचे वय, आरोग्य आणि जुने आजार लक्षात घेता आहारात कोणताही निष्काळजीपणा करू नये. सकस आहार घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते आणि या विषाणूचा खात्मा करण्यासाठी शरीरामध्ये रोगप्रतिकारक पेशी जास्त प्रमाणात विकसित होण्यास मदत मिळते.
-हलका व रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारा आहार
आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्णांना पचण्यास हलका आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारा आहार द्यावा. सोबत रुग्णाच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता होणार नाही, याचीही पूर्ण काळजी घ्यावी. विशेषत: ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘व्हिटॅमिन डी’चा शरीराला पुरवठा होणे गरजेचे आहे. सोबतच गरम पाणी, ताज्या भाज्या, खिचडी आणि हलक्या डाळीचा समावेश आहारामध्ये कराव्यात. यामुळे रुग्णाच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास, थकवा दूर होण्यास, पांढºया रक्तपेशींची संख्या वाढण्यास मदत मिळते.
-मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे
जेवणामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. सोबतच हाडांचेही नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. स्वयंपाकामध्येही कमी प्रमाणातच तेल वापरावे.
-जास्त पाणी प्या
आहारामध्ये साखरेचेही प्रमाण संतुलित ठेवा. जर मधुमेहाचा त्रास असेल तर साखर अजिबात खाऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्या. ताजी फळे खा आणि शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. तंबाखू व मद्यपान करू नये. धूम्रपान करणाºया व्यक्तींपासून दूर राहावे.
- डाळी व भाज्यायुक्त आहार घ्यावा
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी आपल्या आहारात प्रोटीनची मात्रा वाढवायला हवी. रुग्ण जर मांसाहार करीत असेल तर त्याने आपल्या आहारात अंडीचा समावेश करावा. जे मांसाहार करीत नाहीत त्यांनी पनीर, दूध यांचा वापर वाढवायला हवा. जेवणात चणा, राजमासह इतर डाळींचा समावेश करावा. जेवणात तीन-चार चपाती आणि एक वाटी डाळ घेत असाल तर एक चपाती कमी करून दोन वाटी डाळ घ्यावी. आहारात भाज्या व डाळीचे मिश्रण असलेली खिचडी घ्यावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी बदाम, अक्रोडचे सेवन करावे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी चणे, भाजलेले शेंगदाणे घ्यावे. सायंकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ वापरावे.
-कविता गुप्ता
आहारतज्ज्ञ
-तणावमुक्त राहा
होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांसाठी विशेष अशा औषधी नाहीत. यामुळे पौष्टिक आहार वाढवावा. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. कारण, तणावात राहाल तर तणावाच्या हार्माेन्सचे प्रमाण वाढते. आनंदी राहिल्यास हॅपी हार्माेन्सचे प्रमाण वाढून रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत करते. सकारात्मक विचार ठेवा. वेळ घालविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा. मित्रांशी फोनवरून गप्पा मारा. नियमित व्यायाम करा. लक्षणे वाढल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल