तू स्वयं दीप हो, अत्तदीप हो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:25 AM2018-10-15T10:25:49+5:302018-10-15T10:26:37+5:30
१४ आॅक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना धम्माचा मार्ग दाखवला. समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता यांची प्राणप्रतिष्ठा केली. धम्मात निखळ प्रज्ञा आणि करुणेचं अपूर्व मिश्रण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे हजारो वर्षे धर्माच्या गुलामीत खितपत जनावरांपेक्षाही हीन जीवन लादण्यात आलेल्या अस्पृश्यांचा मुक्तिदिन. रक्ताचा एक थेंबही न सांडता अभूतपूर्व अशा धम्मक्रांतीने तथागत बुद्धाच्या धम्माशी जोडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणले. १९५६ ला घडलेल्या त्या धम्मक्रांतीचा आज ६२ वा वर्धापन दिन. अशोक विजयादशमी दिनी बाबासाहेबांनी ही धम्मक्रांती केली, त्यामुळे परंपरेनुसार दसऱ्याला हा दिवस साजरा केला जातो. मात्र तारखेचेही महत्त्व असल्याने आंबेडकरी अनुयायांकडून या दिनालाही महत्त्व दिले जाते. याच दिनाचे औचित्य साधून रविवारी हजारो अनुयायांनी दीक्षाभूमीवर पोहोचून डॉ. बाबासाहेब व तथागत बुद्ध यांना अभिवादन केले.
ज्या जागेवर बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली त्या दीक्षाभूमीला नतमस्तक होऊन त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी सकाळपासूनच पोहोचत होते. दिवसभर आणि रात्रीही हा सिलसिला सुरू होता. विशेषत: १४ आॅक्टोबरला शहरातील अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीला येत असतात. त्यामुळे रविवारी आपसुकच बौद्ध अनुयायांचे पाय दीक्षाभूमीकडे वळले होते. येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता, यावेळीही नित्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. रांगेत लागून अनुयायांनी बाबासाहेब व तथागताच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. भिक्खू संघाचीही यावेळी उपस्थिती होती. कुणी कुटुंबासह पोहोचले तर विविध सामाजिक संघटना व विविध वस्त्यांतील नागरिक पायदळ रॅली काढून प्रेरणाभूमीवर पोहोचले. ‘बुद्धम शरणम् गच्छामी, धम्मम् शरणम् गच्छामी...’, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. बहुतेक उपासक शुभ्र वस्त्र परिधान करून अभिवादनासाठी पोहोचले होते. शेकडो उपासक- उपासिकांनी दीक्षाभूमी परिसरात असलेल्या विहारात पंचशील ग्रहण केले व २२ प्रतिज्ञांची शपथ घेतली. अनुयायांनी मिठाई वितरित करून एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लवकरच येत्या १८ आॅक्टोबर रोजी धम्मदीक्षेचा मुख्य सोहळा असल्याने आजपासूनच दीक्षाभूमी परिसरात बौद्ध साहित्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये पुस्तकांचे, गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संघटनांचेही स्टॉल यामध्ये प्रामुख्याने दिसून येत आहेत.
परिसरातच घेतले भोजन
शहरातील शेकडो लोक कुटुंबासह भोजनाचे साहित्य घेऊन दीक्षाभूमीवर पोहोचले होते. याशिवाय विविध भागातील बुद्ध विहारांचे सदस्य, महिला मंडळाच्या सदस्यांचा समावेश होता. नागरिकांनी या परिसरातील हिरवळीवर सहकुटुंब भोजनाचा आस्वाद घेतला. दरर्वाी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी शेकडो कुटुंब सहभोजनाचा आनंद घेत असल्याने, अलौकिक भावना निर्माण होत असल्याचे मनोगत अनेकांनी व्यक्त केले.
यासोबतच बुद्ध भीम गीतांची मेजवानीही या उत्साहात भर घालत होती. यामुळे एक वेगळे वातावरण दीक्षाभूमी परिसरात दिसून येत असते.
पोलीस व समता सैनिक दलातर्फे सुरक्षा
१४ आॅक्टोबरला दरवर्षी बौद्ध अनुयायांची गर्दी येथे होत असते. ही बाब लक्षात घेता, पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचे उपाय करण्यात आले होते. दीक्षाभूमीच्या समोरील मुख्य मार्गावरील वाहतूक बंद ठेवत, केवळ पादचारी अनुयायांना प्रवेश देण्यात आला होता. रामदासपेठ ते संत चोखामेळा वसतिगृहापर्यंतचा मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. पोलिसांसह समता सैनिक दलाचे सैनिकही सुरक्षेसाठी तैनात होते. दसऱ्याच्या मुख्य सोहळ्याची ही रंगीत तालीमच होती. नागपूरसह पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदाबाद आणि देशभरातील दलाचे सैनिक आज दाखल झाले होते.
संविधान चौकातही नमन
दीक्षाभूमीसह संविधान चौकातही शेकडो अनुयायांनी डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. शुभ्र वस्त्रात पोहोचलेल्या उपासक-उपासिकांनी या ठिकाणी वंदना घेतली. विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीही धम्मक्रांती दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केले.
दीक्षाभूमीवर पोहोचल्या धम्मरॅली
महेंद्रनगर येथील संघमित्रा बौद्ध विहारच्यावतीने भदंत महेंद्र रतन व भिक्खू संघाच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर धम्मरॅली काढण्यात आली. परिसरातील शेकडोच्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी होते. याशिवाय विविध भागातील बौद्ध अनुयायांच्या रॅली दीक्षाभूमीवर पोहोचल्या. तथागत बुद्ध व बाबासाहेबांचा जयघोष करीत पोहोचलेल्या रॅलींनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले. तरुणांनीही मोठ्या संख्येने विविध भागातून रॅली काढल्या. सायंकाळच्या वेळी हे प्रमाण अधिक होते.
शहरात विविध ठिकाणी आयोजन
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध वस्त्या व बुद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना व पूजनाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय काही ठिकाणी प्रबोधन व बुद्ध भीम गीतांचे कार्यक्रमही घेण्यात आले. विविध विषयाला धरून व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.