दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी होऊ शकत नाही; प्रल्हाद वामनराव पै
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 09:29 PM2021-10-23T21:29:13+5:302021-10-23T22:19:57+5:30
Nagpur News दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी करण्याचा ज्याचा कुणाचा मानस आहेत, तो अशक्य आहे, असे मत जीवनविद्या मिशन, मुंबईचे प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले.
नागपूर : अफगाणिस्तानमध्ये घडलेले धार्मिक कट्टरतावादी परिवर्तन असो वा अमेरिकेतील आर्थिक दडपण, त्या सगळ्याचा प्रभाव जगावर पडतो आहे. त्यामुळे दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी करण्याचा ज्याचा कुणाचा मानस आहेत, तो अशक्य आहे, असे मत जीवनविद्या मिशन, मुंबईचे प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत सहभागी होण्यासाठी ते आले असता शनिवारी 'लोकमत'शी बोलत होते.
सद्गुरू वामनराव पै यांनी निसर्ग नियमाला धरून जीवनविद्या तत्त्वज्ञान सांगितले. निसर्ग तत्त्वज्ञान सगळ्यांसाठी सारखेच आहे. आपल्या ऋषी, मुनींनी याच तत्त्वज्ञानाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले आहे. एकवेळ सर्व धर्म सगळ्यांसाठी असण्यावर दुमत असू शकेल; मात्र निसर्ग तत्त्वज्ञान सगळ्यांसाठी नाही असे कुणीच म्हणू शकत नाही. ''मैं नहीं हम, हम नहीं सब'' हा विचार जीवनविद्या मिशन शिकवतो. मानवी देह परावलंबी आहे आणि इतरांच्या सुख-दुःखात आपले वैयक्तिक सुख-दुःख समाविष्ट असते, याचे भान जागृत होणे गरजेचे आहे. या आंतरधर्मीय परिषदेतून जागतिक सौहार्दाचे चिंतन बाहेर पडावे, अशी भावना प्रल्हाद वामनराव पै यांनी यावेळी व्यक्त केली.