युद्ध नको असेल तरी युद्धसज्ज असावेच लागते : चारुदत्त आफळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:54 PM2020-01-03T22:54:32+5:302020-01-03T23:04:04+5:30
साम-दाम-दंड भेद आखत युद्धसज्ज असावेच लागेल, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत्त आफळे यांनी वाल्मिकी व तुलसी रामायणाचा संदर्भ घेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रावणाने स्वत: कोणतेच अत्याचार केले नाही, असा गवगवा केला जातो. मात्र, अत्याचार करणाऱ्यांचा तो म्होरक्या होता, हे का विसरले जाते. त्याच्याच आदेशाने सर्व क्रूर खुरापत्या सुरू होत्याच ना. त्यामुळेच, सर्व ऋषीमुनींनी विष्णूयाग करून भगवान विष्णूला अवतार घेण्यास भाग पाडून, व्युहरचना आखण्यास सुरुवात केली. ऋषीमुनींना युद्ध नकोच होते. मात्र, आपल्याच कुळातला राक्षसी वृत्ती धारण करतो, तर त्याचा नायनाट करण्याठी युद्ध करणे भाग होते आणि म्हणूनच ते संपूर्ण सज्ज होते आणि वर्तमानातही तसेच साम-दाम-दंड भेद आखत युद्धसज्ज असावेच लागेल, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत्त आफळे यांनी वाल्मिकी व तुलसी रामायणाचा संदर्भ घेत केले.
कीर्तन महोत्सव आयोजन समिती महाल, राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्ट व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शिक्षक सहभागी बँक सभागृहात ‘राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव २०२०’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात आफळेबुवांनी ‘काश्मिरचा लढा’ हा विषय गुंफला. कीर्तन परिसराला संत निकालस महाराज परिसर असे नाव देण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन महापौर संदीप जोशी, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, सोमलवार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव सोमलवार, सचिव प्रकाश सोमलवार, भाजपाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, किशोर धाराशिवकर, संयोजक श्रीपाद रिसालदार, शुभप्रेरक दिगंबरबुवा नाईक यांच्या हस्ते करण्यता आले. यावेळी सेवानिवृत्त ब्रिगेडीयर रूपचंद जैस यांचा सत्कार करण्यात आला.
ब्रिटीशांच्या नेतृत्त्वात लढणाऱ्या भारतीय सैन्याला १९४७ नंतर प्रथमच स्वत:च्या नेतृत्त्वात पाकीस्तानशी भिडावे लागले. त्यात जय झाला, त्याहीपेक्षा सैनिक आणि भारतीयांचे मनोबल उंचावण्यासाठी हे युद्ध महत्त्वाचे ठरल्याचे आफळे म्हणाले. यावेळी त्यांनी पहिला परमवीरचक्र विजेता सोमनाथ शर्मा आणि महाराष्ट्राचा पहिला परमवीर चक्र विजेता रामा राघोबा राणे यांच्या कर्तृत्त्वावर प्रकाश टाकला. समर्थ रामदास स्वामींना रामायणातील रामाचा पराक्रम आवडीचा होता. मात्र, त्याच काळात इतर संत शांतीचा मार्ग सांगत होते. शांतीचा तो मार्ग चुकीच्या अर्थाने घेतला आणि घात झाला. तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथात राम पराक्रमाचे कौतुकच केले आहेत, याचा विसर का पडतो, असा सवाल उपस्थित करताना आपल्याकडे अल्लाउद्दीन खिलजी कसा आला, याचा वेध आफळे बुवांनी घेतला. तो महाराष्ट्राची राजधानी असलेल्या देवगीरीवर आक्रमण करतो आणि त्याची शुल्लक कल्पनाही तत्कालिन राजाला होऊ नये, हा बेजबाबदारपणाच असल्याचे ते म्हणाले. शिवाय, त्या काळात उत्तरेत जाणाऱ्या ऋषीमुनींना खिलजीची ती घोडदौड का समजू नये, असा सवाल उपस्थित करत अशाच निर्लज्ज उपासकांमुळेच वाटोळे झाल्याचा प्रहारही त्यांनी केला.
प्रास्ताविक श्रीपाद रिसालदार यांनी केले. संचालन स्मिता खनगई यांनी केले. आरतीचे यजमान श्रुती व निरज धाराशिवकर होते. कार्यक्रमाला पुष्कर लाभे, निरंजन रिसालदार, अनिल देव, सतीश कविश्वर, रमेश पोफळी, सौरभ महाकाळकर, आलोक रिसालदार उपस्थित होते.
केवळ सीमासंरक्षण म्हणजेच राष्ट्रधर्म नव्हे - संदीप जोशी
राष्ट्रधर्म म्हणजे केवळ सीमेचे संरक्षण एवढीच व्याख्या नव्हे तर जे जे आहे ते ते वाचवणे, यालाही राष्ट्रधर्म म्हणतात. साफसफाई, पाणीबचत, बेटी बचाव अशा अनेक गोष्टी राष्ट्रधर्माच्याच असल्याची भावना महापौर संदीप जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.