तुम्ही एसटीची तिजोरी भरा, आम्ही तुमचे खिसे भरू; एसटीची नवी योजना

By नरेश डोंगरे | Published: September 14, 2024 02:35 AM2024-09-14T02:35:58+5:302024-09-14T02:38:20+5:30

३० दिवसांचा प्रयोग : वाहक-चालकांना प्रोत्साहन भत्ता

You fill ST's coffers, we'll fill your pockets; NEW SCHEME OF ST | तुम्ही एसटीची तिजोरी भरा, आम्ही तुमचे खिसे भरू; एसटीची नवी योजना

तुम्ही एसटीची तिजोरी भरा, आम्ही तुमचे खिसे भरू; एसटीची नवी योजना


नागपूर : अडथळ्यांची शर्यत पार कडून उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी आता एक नवी योजना जाहिर केली आहे. शुक्रवारी १३ सप्टेंबरला जाहिर झालेली ही योजना एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी आहे, हे विशेष !

जुनाट बसेसमुळे रस्त्यात लालपरीचे कधीही रुसून बसणे, अचानक लागणाऱ्या आगी, अपघात, कर्मचाऱ्यांचे प्रश्न कामगारांच्या प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेसाठी संघटनांकडून संपाचे वारंवार मिळणारे ईशारे आदी एक ना अनेक अडथळे पार करत एसटीच्या लालपरीची धावपळ सुरू आहे. तिच्या या रात्रंदिवसाच्या परिश्रमाला उत्पन्नाची झालर लागावी म्हणून एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या योजना जाहिर केल्या जातात.

गेल्या वर्षी महिलांना सरसकट पन्नास टक्के प्रवास भाड्यात सवलत जाहिर झाली आणि एसटीला लक्ष्मी पावली. एसटीच्या प्रवाशी संख्येत तसेच उत्पन्नातही लक्षवेधी भर पडली. सुगीचे दिवस आल्यागत एसटी बसेस भरभरून धावत आहेत. एकीकडे हे असे सुखद चित्र असताना काही चालक-वाहक अलिकडे प्रवाशांकडे दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार आहे. बसमध्ये जागा असूनही प्रवाशांनी कुठे हात दाखविला तर एसटीचे चालक वाहक त्या प्रवाशांना दुर्लक्षित करून पुढे निघून जातात. अशा तक्रारी वाढल्या असतानाच यामुळे एसटीला होणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नालाही फटका बसत आहे. ते ध्यानात घेऊन एसटी महामंडळाने चालक-वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना जाहिर केली आहे. आज १३ सप्टेंबरला राज्यातील मुंबई, नागपूरसह सर्वच विभाग नियंत्रकांना या योजनेसंबंधीची माहिती पाठविण्यात आली आहे.

अशी आहे योजना -
२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या ३० दिवसांच्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर महामंडळाकडून ही योजना राबविली जाणार आहे. या दिवसांतील प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाची गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर) प्रत्येक दिवसाच्या उत्पन्नाची तुलना केली जाईल. त्यानंतर गेल्या वर्षी या कालावधीत किती उत्पन्न होते आणि त्यापेक्षा किती जास्त उत्पन्न यावेळी मिळाले, त्या आकड्यांचा हिशेब केला जाईल.

चालक, वाहकांना मिळणार २० टक्के -
प्रत्येक आगाराचे लेखाकार आणि सहायक वाहतूक अधीक्षक आर्थिक ताळेबंद काढून रक्कम तपासतील. त्यानंतर गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा जेवढी जास्त (अतिरिक्त) रक्कम मिळाली, त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक, वाहकांना (१० - १० टक्के) विभागून दिली जाईल.

...तर, मिळणार नाही भत्ता -
या कालावधीत परिश्रम घेऊन, विशेष प्रयत्न करून चालक वाहकाने एसटीच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न ओतले आणि चुकून त्यांच्यापैकी कुण्या चालक वाहकाने प्रवाशांसोबत गैरवर्तन केले, त्याची तक्रार आल्यास त्या चालक किंवा वाहकाला प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळणार नाही.
 

Web Title: You fill ST's coffers, we'll fill your pockets; NEW SCHEME OF ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर