तुम्ही अपमान केलाय, पण परत या; महापौर संदीप जोशी यांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 07:40 AM2020-06-22T07:40:28+5:302020-06-22T07:52:29+5:30
आपण राग सोडून सभागृहात परत यावे , ही सभागृहाची भावना असल्याने मंगळवारी होणाऱ्या सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना रविवारी पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या इतिहासात शनिवारी सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी सभागृह सोडून जाण्याची दुर्दैवी तितकीच क्लेशदायक घटना घडली. याचे मला अत्यंत वाईट वाटते. आपले नाव नागपूर महापालिकेच्या इतिहासात घटनेची पायमल्ली करताना नोंदविले. मनपा कायद्यानुसार सभागृह हे सार्वभौम आहे. आपण सभागृहातून निघून जाणे हा सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळेच सभागृह स्थगित केले आहे. आपण राग सोडून सभागृहात परत यावे , ही सभागृहाची भावना असल्याने मंगळवारी होणाऱ्या सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना रविवारी पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
सभागृहाचे काही नियम असतात. लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे काही अधिकार असतात. सभागृहात नगरसेवक माहिती देण्यासाठी बोलत असेल किंवा अधिकारी उत्तर देत असेल तर कुठलाही नगरसेवक ‘पॉईंटऑफ ऑर्डर’ अथवा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ या खाली बोलणाऱ्याला मध्ये थांबवून आक्षेप नोंदवू शकतो. नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांच्या प्रश्नावर आपण उत्तर देत असताना ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकरजी तिवारी यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ घेतले. मी बोलत असताना कुणीही मध्ये बोलू नये ही आपली चुकीची भूमिका संपूर्ण सभागृहाने अनुभवली. याचवेळी ‘मी सभागृहात थांबत नाही’ अशी भावना आपण व्यक्त केली. परंतु थांबलात, त्यानंतर लगेच ग्वालबंशी यांनी आपल्या नावासंदर्भात काही शब्दच्छल केला. ज्याचे समर्थन कुणीही करणार नाही. हे शब्द सभागृहाच्या रेकॉर्ड वरून काढण्यास आपण विनंती केली असती तर ते काढण्याचे आदेश मी तात्काळ दिले असते. सभागृहात असे प्रकार अनेकदा होतात. आपण सरळ सभागृहाचाच त्याग करणे हे वर्तन ‘आयुक्त’ या पदाची गरिमा, सभागृह, तसेच लोकशाहीची गरिमा कलंकित करणारे असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.
शहर व विकासासाठी हानीकारक
निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्तांनी आपल्याला भ्रमणध्वनीवरून सभागृहात येण्याची विनंती केली. मी सुध्दा आपणास भ्रमणध्वनीवरून सभागृहात येण्याची विनंती केली. मात्र ‘जिथे माझा अपमान होत असेल तिथे मी येणारच नाही’ अशीच भूमिका कायम ठेवली. ही भूमिका सभागृहाच्या दृष्टीने आणि शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले.
आवश्यक कामासाठी निधी द्या
महोदय, कोविड-१९ च्या काळात या शहराला आपली गरज आहे. मात्र कुठेतरी जनप्रतिनिधींशी संवाद ठेवणे, त्यांचेही कधी-कधी ऐकून घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण आज पावसाच्या पाण्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले आहे, गडरचे चेंबर तुटले आहेत, घाण पाणी घरात घुसले आहे, नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. आपण आश्वासनानंतरही यासाठी निधी दिला नाही. त्यामुळे नगरसेवक चेंबरही बनवू शकत नाही ही सत्यस्थिती आहे. कृपया याची आपण दखल घ्यावी ही विनंती.