तुने मारी एन्ट्री...
By admin | Published: January 1, 2015 01:29 AM2015-01-01T01:29:58+5:302015-01-01T01:29:58+5:30
‘फाईव्ह...फोर....थ्री....टू....वन!!!!’ घडाळ्यात बाराचा ठोका वाजला अन् उपराजधानीच्या आसमंतात रंगीबेरंगी रंगांच्या फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ‘हॅप्पी न्यू ईयर’, ‘वेलकम- २०१५’ अशा
नववर्षाचे उत्स्फूर्त स्वागत : धम्माल अन् ‘रॉकिंग’ सेलिब्रेशन
नागपूर : ‘फाईव्ह...फोर....थ्री....टू....वन!!!!’ घडाळ्यात बाराचा ठोका वाजला अन् उपराजधानीच्या आसमंतात रंगीबेरंगी रंगांच्या फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ‘हॅप्पी न्यू ईयर’, ‘वेलकम- २०१५’ अशा शुभेच्छांनी शहरातील घरे, कॉलनी अन् वस्त्या दुमदुमून गेल्या. ‘सेलिब्रेशन’ करत असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता आणि अपेक्षा होत्या सुख, समृद्धी अन् भरभराटीच्या. रस्त्यांपासून ते गच्चीपर्यंत, बच्चेकंपनीपासून ते ज्येष्ठापर्यंत आणि झोपडीपासून ते थेट फाईव्हस्टार हॉटेल्सपर्यंत सर्वांनीच आपापल्या परीने ‘सेलिब्रेशन’ केले. शहरातील प्रेक्षणीय स्थळांपासून ते तरुणाईच्या कट्ट्यांवर दरवर्षी प्रमाणेच गर्दी दिसून आली. परंतु अनेकांनी रस्त्यांवर किंवा फुटाळासारख्या ठिकाणी उत्साह दाखविण्याऐवजी घरीच संयमाने थांबणे पसंत केले. गुलाबी थंडीच्या सानिध्यात शहरातील सोसायटींमध्ये इमारतींच्या गच्चीवर कौटुंबिक ‘टेरेस पार्टी’ झाल्या.(प्रतिनिधी)
अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम
शंकरनगर चौकाजवळ रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने लागल्याने ट्राफिक जाम झाल्याची स्थिती होती. पोलिसांना ही वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. शिवाय व्हेरायटी चौक, वर्धमान नगर, अजनी चौक, प्रताप नगर, लक्ष्मीनगर, सक्करदरा, सेंट्रल एव्हेन्यू , सदर येथे तरुणाईचा उत्साह होता.
‘सीसीटीव्ही’द्वारे ‘वॉच’
‘न्यू ईयर’चा सर्वात जास्त जल्लोष शंकरनगर ते लॉ कॉलेज चौक या रस्त्यावर असतो. तरुणाईसोबतच नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी येथे प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. शंकरनगर, लक्ष्मीभुवन आणि लॉ कॉलेज चौकात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले होते. याद्वारे पोलिसांचे येणाऱ्या जाणाऱ्यांवर ‘मॉनिटरींग’ करण्यात येत होते हे विशेष.
हॉटेल्स, ढाबे ‘हाऊस फुल्ल’
‘थर्टी फर्स्ट’च्या ‘नाईट’साठी शहरातील हॉटेल्स, पब्ज यांनी प्रचंड प्रमाणावर मार्केटिंग केले होते. कोणी सिरीयलमधील कलाकारांना आमंत्रित केले होते तर कुठे नामवंत डीजेंचे आकर्षण होते. या सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक हॉटेल्सने यावेळी ‘डिस्काऊंट’देखील ठेवले होते. अनेक शौकिनांनी शहराबाहेरील ढाब्यांकडे मोर्चा वळविला होता. यात अमरावती रोड व वर्धा मार्गावर जास्त गर्दी दिसून येत होती. याशिवाय शहरातील निरनिराळे बार तर सायंकाळी ७ वाजल्यापासूनच हाऊस फुल्ल झालेले दिसत होते. अनेक नागरिकांनी सहकुटुंब रेस्टॉरंटमध्ये जाऊन ‘सेलिब्रेशन’ केले.