५ जी सेवेच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 08:00 AM2022-10-16T08:00:00+5:302022-10-16T08:00:06+5:30
Nagpur News अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये ५ जी अपडेट करण्यासाठी आतुर झाले आहेत. नागरिकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे.
दयानंद पाईकराव
नागपूर : भारतात ५ जी लाँच झाले आहे. ४ जी पेक्षाही अधिक वेगवान आणि इतरही अनेक सुविधा देणारे ५ जी तंत्रज्ञान नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये ५ जी अपडेट करण्यासाठी आतुर झाले आहेत. नागरिकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना सायबर पोलिसांनी दिल्या आहेत. तुमच्या मोबाइलमधील ४ जी नेटवर्क अपग्रेड करून ५ जी करुन घ्या, असे सांगणारा मेसेज किंवा कॉल कोणालाही येऊ शकतो. त्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करूूूूूूूूूूूूूूूूूूून पुढील प्रक्रिया पूर्ण करा, असे सायबर गुन्हेगार सांगतात आणि फसवणूक करतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन फसवणुकीसाठी ५ जीचा नवा ट्रेंड
-सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमचा मोबाइल हॅक होतो. सर्व डेटा, फोटो, बँकेचे डिटेल्स सायबर गुन्हेगारांच्या हातात जातात. त्यानंतर, हे सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करून लुटतात. नागरिकांना लुटण्याचा हा नवा ट्रेंड सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे.
कुठल्याही लिंकवर ५ जी सेवा अपडेट होत नाही
- कोणतीही टेलिकॉम कंपनी अशा प्रकारे मॅसेज किंवा लिंकद्वारे ५ जी सेवा अपग्रेड करीत नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. ऑनलाइन पद्धतीने सिमकार्ड अपग्रेड करणे धोक्याचे ठरू शकते. त्यासाठी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
काय काळजी घ्याल?
- मोबाइलवर आलेल्या मेसेज किंवा कॉलवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतीही लिंक क्लिक करणे धोक्याचे आहे. सिम कार्ड अपग्रेड करण्यास सांगणारा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरते. याशिवाय कुठलाही ओटीपी शेअर करू नये.
केबीसीची लॉटरी, वीजबिल थकले हे फंडे झाले जुने
- सायबर गुन्हेगार यापूर्वी तुमची केबीसीची लॉटरी लागली आहे, तुमचे वीजबिल थकले असून, लवकरच वीज कनेक्शन कापण्यात येईल, असे मेसेज पाठवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करीत होते, परंतु या घटना आता नित्याच्या झाल्यामुळे नागरिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी ५ जीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे.
जानेवारीपर्यंत सुरू होणार ५ जी सेवा
- नागपुरात अजून ५ जी सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी ५ जी अपग्रेड करा, अशा फसव्या संदेशाला प्रतिसाद देण्याची गरज नाही. जानेवारी महिन्यापासून नागपुरात ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासगी मोबाइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मोबाइल कंपनीत जाऊन ५ जी अपग्रेड करा
‘५ जी सेवा अपग्रेड करण्याचे मेसेज आल्यास अशा मेसेजला प्रतिसाद देऊ नये. आपले सिम कार्ड अपग्रेड करायचे असल्यास संबंधित मोबाइल कंपनीच्या आउटलेटमध्ये जाऊन सिम कार्ड अपग्रेड करणे फायद्याचे आहे.’
- नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन.
.............