तुम्ही एक पाऊल पुढं या, आम्ही एक पाऊल मागे येतो; संदीप जोशी यांचे तुकाराम मुंढे यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:24 AM2020-06-23T11:24:39+5:302020-06-23T11:30:03+5:30
मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेअगोदर संदीप जोशी यांनी, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो किंवा तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो असे आवाहन मनपा आयुक्तांना केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यादरम्यान सुरू असलेल्या वादामध्ये मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेअगोदर संदीप जोशी यांनी, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो किंवा तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो असे आवाहन मनपा आयुक्तांना केले आहे.
सोमवारी संध्याकाळी महापौरांनी आयुक्तांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि. (एनएसएसडीसीएल)च्या संचालक मंडळाची मंजुरी नसताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, एनएसएसडीसीएलच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर आणि लेखा अधिकारी अमृता देशकर यांनी संगनमताने ५० कोटीच्या निविदा जारी केल्या. तसेच कंत्राटदारांना १८ कोटीची रक्कम अदा केली. हा कंपनी कायद्याच्या कलम ४४७ नुसार गुन्हा असल्याने यासंदर्भात मुंढे यांच्यासह तिघांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महापौरांनी स्वत: पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून तकार दाखल केल्याने महापालिका प्रशासनासह शहरातही खळबळ उडाली आहे.
तर माझी नियुक्ती नियमानुसार असून कोणतेही नवीन कंत्राट दिले नाही. जुने बिल दिले. सर्व व्यवहार कायदेशीर व पारदर्शी असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. मुंढे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४०९ ,४२०, ४६३, ४६४,४६५,४६८ व अन्वये व कंपनी कायदा कलम ४४७ नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप जोशी यांनी या तकारीत केली आहे. सदर तक्रार पोलिसांनी पुढच्या कारवाईसाठी पोलिस आयुक्तांकडे पाठविली आहे, त्यावर काय कारवाई करायची, या संबंधात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
सभेअगोदर बोलताना जोशी पुढे म्हणाले, राग सोडा आणि सभेला या. शहराचा विकास हा महत्त्वाचा आहे. आपण दोघे मिळून काम करू ते अधिक योग्य राहील. आमच्याबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या पोलिसांकडे द्याव्यात. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. मात्र जनतेचे काम आधी करणे हे महत्त्वाचे आहे.