तुम्ही मते द्या, मी प्रायोजक देतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:26 AM2017-11-10T01:26:14+5:302017-11-10T01:26:28+5:30
साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकायची असेल तर राजकीय निवडणुकीसारखे साम-दाम-दंड-भेद हे सर्व पर्याय वापरावेच लागतील, असा जणू संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांचाही ग्रह झालेला आहे.
शफी पठाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकायची असेल तर राजकीय निवडणुकीसारखे साम-दाम-दंड-भेद हे सर्व पर्याय वापरावेच लागतील, असा जणू संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांचाही ग्रह झालेला आहे. त्यातूनच एका उमेदवाराने बडोद्यातील संमेलनाच्या आयोजकांना तुम्ही मला एकगठ्ठा मते द्या, मी तुम्हाला प्रायोजक मिळवून देतो, अशी ‘फायद्याची आॅफर’दिल्याची साहित्यसृष्टीत जोरदार चर्चा आहे. ‘तो’ उमेदवार कोण याची आता चिकित्सा सुरू असून शारदेच्या उत्सवासाठी असे लक्ष्मीचे आमिष दाखवले जात असल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे. यंदाचे संमेलन गुजरात राज्यातील बडोद्यात होत आहे. महाराष्ट्र शासनाने या संमेलनसाठी २५ लाखांचा निधी आधीच दिला आहे.
परंतु संमेलनाचा खर्च एकूणच कोटीच्या घरात असल्याने व सध्या गुजरातमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने तेथील स्थानिक राजकीय प्रायोजक मिळवताना आयोजकांच्या प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत.
गुजरात सरकारकडून या संमेलनासाठी निधी मिळावा, याकरिताही आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आयोजकांची निधीसाठी होणारी ही दमछाक नेमकी हेरून एका उमेदवाराने आयोजकांच्या ताब्यातील एकगठ्ठा मते मिळावी यासाठी त्यांना प्रायोजकत्व मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याची जोरदार चर्चा आहे.
घटक संस्थाप्रमुखांना राजकीय नेत्यांचे फोन?
आपल्या पसंतीचा उमेदवार संमेलनाध्यक्षपदी निवडून यावा, यासाठी आता काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही थेट आखाड्यात उतरून घटक संस्थाप्रमुखांना फोनाफोनी सुरू केल्याचे वृत्त आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी २७ आॅक्टोबर रोजी मतदारांना पोस्टाने मतपत्रिका पाठवल्या आहेत. येत्या ९ डिसेंबरपर्यंत या मतपत्रिका महामंडळाकडे परत पाठवायच्या आहेत. त्याआधी या मतपत्रिकांवर आपले नाव कोरले जावे, यासाठी काही उमेदवार आपले राजकीय वजन वापरत मतदारांवर दबाव निर्माण करत असल्याची चर्चा आहे. याहून गंभीर बाब म्हणजे यातल्याच एका उमेदवाराने तर थेट धर्माचे साकडे घालून मतांचा जोगवा मागितल्याचे किस्सेही साहित्य वर्तुळात चर्चिले जात आहेत.
अशी कुठलीही ‘आॅफर’ नाही
आम्हाला कोणत्याही उमेदवाराने प्रायोजकत्व मिळवून देण्यासाठी कुठलीही आॅफर दिलेली नाही. आम्ही संमेलनाच्या तयारीत व्यस्त असून हे संमेलन अधिक चांगले कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत.
दिलीप खोपकर, अध्यक्ष, मराठी वाङ्मय परिषद, बडोदा