या... पोलीस ठाण्यात तुमचे स्वागत आहे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:46 AM2018-03-09T00:46:42+5:302018-03-09T00:47:09+5:30
उंचावलेल्या भुवया, भेदक नजरा आणि आरडाओरड! प्रसंगी आरोपीचे कानशिलंग गरम करण्यात गुंतलेले पोलीस. खरखर करत गुन्ह्यांची सूचना देणारी सतत सुरू असलेली वॉकीटाकी अन् धावपळ करणारे खाकी वर्दीतील पोलीस, असे गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील रोजचे रुक्ष वातावरण. आज मात्र गुन्हे शाखा, प्रशासन, मुख्यालय, ट्रॅफिक, विशेष शाखेसह सर्वच पोलीस ठाण्यातील वातावरण उत्साही होते. ठाण्यात येणाऱ्यांना ‘या तुमचे स्वागत आहे... ’असे बोल कानी पडत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उंचावलेल्या भुवया, भेदक नजरा आणि आरडाओरड! प्रसंगी आरोपीचे कानशिलंग गरम करण्यात गुंतलेले पोलीस. खरखर करत गुन्ह्यांची सूचना देणारी सतत सुरू असलेली वॉकीटाकी अन् धावपळ करणारे खाकी वर्दीतील पोलीस, असे गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील रोजचे रुक्ष वातावरण. आज मात्र गुन्हे शाखा, प्रशासन, मुख्यालय, ट्रॅफिक, विशेष शाखेसह सर्वच पोलीस ठाण्यातील वातावरण उत्साही होते. ठाण्यात येणाऱ्यांना ‘या तुमचे स्वागत आहे... ’असे बोल कानी पडत होते.
खाकीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांऐवजी पारंपरिक साड्या आणि पातळात छान वेशभूषा करून आलेल्या महिला दिसत होत्या. सकाळी ९ वाजतापासून तो रात्री १० वाजेपर्यंत बहुतांश ठाण्यात स्वागत, अभिनंदन अन् गप्पाटप्पा असे हलकेफुलके वातावरण होते. तक्रार घेऊन येणाऱ्यांची आस्थेने विचारपूस होत होती. तेवढ्याच सहजपणे त्याची तक्रार, समस्या मार्गी लावण्याचेही प्रयत्न होत होते. मध्ये मध्ये शुभेच्छा देण्यासाठी येणाºया स्वयंसेवी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या स्वागताचा, मिठाई देण्या-घेण्याचा आणि गप्पाटप्पांचाही छोटेखानी कार्यक्रम रंगत होता. अनेक पोलीस ठाण्यात केक कापले गेले अन् एकमेकांना मिठाई भरविण्यात आली.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी आयुक्तालयात कार्यरत अधिकारी-कर्मचारी महिलांना एकत्रित करून त्यांचे अभिनंदन केले. त्यांना शुभेच्छा देऊन सकाळी कामकाजाला प्रारंभ झाला.
गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर या दिवसभर पोलीस भरती अन् बैठकीत व्यस्त होत्या. सायंकाळी मात्र त्यांनी आपल्या कार्यालयात जाऊन सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्र केले. त्यांना मिठाई दिली. चहापाणीही झाले अन् कर्तव्यासोबतच पारिवारिक गप्पाटप्पाही झाल्या. विशेष शाखेत उपायुक्त स्मार्तना पाटील यांनीही असेच केले. प्रशासन विभागात उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनीही आपल्या महिला सहकाºयांना शुभेच्छा अन् मिठाई दिली.
शहरातील विस्कळीत वाहतुकीमुळे पोलिसांची वाहतूक शाखा नेहमीच वादग्रस्त चर्चेत अन् दडपणात असते. आज वाहतूक शाखेतील वातावरण हलकेफुलके होते. विविध चौकात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देत होत्या. गुलाबपुष्प अन् मिठाईही देत होत्या. विशेष म्हणजे, रस्त्यावर बसून भाजीपाला, खेळणी, हातठेल्यावर विविध वस्तू विकणाऱ्या महिलांना महिला पोलीस गुलाबपुष्प देऊन ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असे सांगून आश्वस्त करीत होत्या. पोलीस नियंत्रण कक्षातही रोजच्याप्रमाणे गुन्ह्यांची, घटनांची माहिती देण्यासोबत शुभेच्छा देण्या-घेण्याचे प्रकार दिवसभर सुरू होते. भरोसा सेलमध्येही वातावरण उत्साही होते. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेत महिला पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, एसीपी डॉ. अश्विनी पाटील, एसीपी रिना जनबंधू आणि त्यांच्या अधिनस्थ महिला अधिकारी-कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत कार्यालयात कार्यरत होत्या.
येलकेवार बनल्या सीताबर्डीच्या ठाणेदार
शहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी पोलीस ठाण्याचा कार्यभार आज एक दिवसासाठी सहायक पोलीस निरीक्षक छाया येलकेवार यांनी सांभाळला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी येलकेवार यांना महिला दिनाच्या निमित्ताने एक दिवसासाठी ठाणेदार म्हणून पदभार सोपविला. डे आॅफिसर म्हणून संगीता किल्लेवार यांनी जबाबदारी सांभाळली. स्वागत कक्षात रुखसार पठाण या महिला शिपायाने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत करून त्यांची वास्तपुस्त केली. दुकानदार आपला मोबाईल देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार घेऊन दुपारी एक महिला सीताबर्डी ठाण्यात आली. तिला चहापाणी देऊन बसविण्यात आले. तेवढ्या वेळेत पोलिसांनी त्या मोबाईल दुकानदाराला ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात येताच त्या दुकानदाराने महिलेसमोर दिलगिरी व्यक्त करून तिचा मोबाईल तिला परत केला. एक दिवस का होईना, ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर खूप आत्मविश्वास वाढला. आम्हीही पोलीस ठाणे सांभाळू शकतो,असा आत्मविश्वास विविध पोलीस ठाण्यात कार्यरत महिला-पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
आयुक्तांची धंतोली ठाण्यात भेट
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गुरुवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान धंतोली पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली. शहरातील ३० पोलीस ठाण्यांपैकी एकमात्र महिला ठाणेदार सीमा मेहंदळे धंतोली ठाण्यात आहेत. त्यांनी आयुक्तांचे स्वागत केले. तर आयुक्तांनी ठाणेदार मेहंदळेसह धंतोलीतील सर्व महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.