येथे पोहायला जाल तर तुमचा जीव जाईल; वाकी डोहात जाण्यास प्रतिबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:22 PM2023-09-07T17:22:45+5:302023-09-07T17:24:00+5:30
खापा पोलिसांनी याबाबतचे सूचना फलक या ठिकाणी लावले आहेत.
नागपूर : सावनेर तालुक्यातील वाकीचा डोह धोक्याचे क्षेत्र (डेंजर प्लेस) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मागील महिन्यात या डोहात चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. आजवर येथे अनेकांचे जीव गेले आहेत. तर या ठिकाणी पर्यटक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता हे क्षेत्र आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. खापा पोलिसांनी याबाबतचे सूचना फलक या ठिकाणी लावले आहेत.
सावनेर तालुक्यातील वाकी दर्ग्यापासून काही अंतरावर कन्हान नदीचे पात्र आहे. वाकी येथे ताजुद्दीनबाबा यांचा दर्गा आहे. त्यामुळे वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते. दर्ग्यापासून काही अंतरावर कन्हान नदीचे पात्र आहे. हे स्थळ पिकनिक स्पॉट म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी अनेकजण उतरतात. मात्र, येथील डोहातील पाण्याचा अंदाज येत नसल्याने आजवर येथे अनेकांचा मृत्यू झाला आहे.
वाकीच्या डोहात पोहण्यास आणि या परिसरात सेल्फी काढण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटक आणि महाविद्यालयीन तरुणांनी पोलिसांनी लावलेल्या सूचना फलकाचे पालन करावे.
मनोज खडसे, ठाणेदार, खापा