काश्मीरची केशरशेती उष्णकटिबंधीय नागपुरात; ४ बाय ४ ची बंद खोली.. ५ महिने अन् लाखांची कमाई

By मंगेश व्यवहारे | Published: November 15, 2023 11:16 AM2023-11-15T11:16:16+5:302023-11-15T11:21:10+5:30

उच्चशिक्षित तरुण दाम्पत्याने घरातंच फुलवली केशरशेती

young couple from nagpur flourished a saffron farm at home in 4 by 4 closed room and earns 8 lakhs | काश्मीरची केशरशेती उष्णकटिबंधीय नागपुरात; ४ बाय ४ ची बंद खोली.. ५ महिने अन् लाखांची कमाई

काश्मीरची केशरशेती उष्णकटिबंधीय नागपुरात; ४ बाय ४ ची बंद खोली.. ५ महिने अन् लाखांची कमाई

मंगेश व्यवहारे

नागपूर : काश्मीर व थंड प्रदेशात होणारी केशरची शेती उष्णकटिबंधातील नागपूर शहरातही शक्य झाली आहे. नागपुरातील एका तरुण दाम्पत्याने चार बाय चारच्या एका बंद खोलीत केसर शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या पाच महिन्यात या केसर शेतीच्या माध्यमातून तरुण दाम्पत्याला तब्बल ८ लाख रुपये किमतीचे दीड ते दोन किलो केशरचे उत्पादन अपेक्षित आहे. सध्या तीन महिन्याच्या कालावधीत अर्धा किलो केशरचं उत्पादन देखील त्यांनी प्राप्त केले आहे.

अक्षय होले आणि दिव्या लोहकरे होले असे या तरुण व प्रयोगशील दाम्पत्याचे नाव आहे. दिव्या बँकेत अधिकारी आहे तर अक्षयचा स्वतःचा व्यवसाय आहे. दोघांनाही शेतकरी आणि शेतीच्या बाबतीत प्रचंड ओढ आहे. आई-वडील शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना कायम शेतीच्या क्षेत्रात काहीतरी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची त्यांची इच्छा होती. अशातच त्यांना इंटरनेटवर केसर शेतीच्या प्रयोगाची माहिती समजली, त्यानंतर केसर शेतीच्या बाबतीत अधिकची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. केशरची शेती आपल्या घरातदेखील करता येते, ही संकल्पना समजल्यानंतर दिव्या आणि अक्षय यांनी थेट काश्मीर येथे जाऊन यासंदर्भात माहिती घेतली आणि शहरातील लोकसेवानगरात त्यांनी केसर शेतीचा प्रयोग केला. यासाठी अक्षय आणि दिव्याने तब्बल दीड-दोन वर्ष अभ्यास केला. ही केसर शेती विदर्भातील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार असा दावा दोघांचाही आहे.

- नागपूरच्या उष्ण वातावरणात केसर शेती

आपल्या देशात केशराचे उत्पादन हे उत्तरेकडील थंड राज्य असलेल्या जम्मू-काश्मीरमध्येचं होते. केशरची शेती करण्यासाठी वातावरण फार थंड असावं लागतं. अक्षय आणि दिव्या यांनी एरोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला.

- एरोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय ?

गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसाठी एरोपोनिक्स तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये बंद खोलीत तापमानाला नियंत्रित करून शेती केली जाते. यामध्ये माती किंवा पाण्याचा उपयोग केला जात नाही. कमी वेळेत अगदी लाखोंचे उत्पादन मिळवून देणाऱ्या या नव्या आणि वेगळ्या प्रयोगाला एरोपोनिक्स तंत्रज्ञान असे म्हणतात.

- अशी केली जाते केसर शेती

अक्षय आणि दिव्या यांनी केसर शेती करण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांनी काश्मीरच्या जिल्ह्यातून केसर बियाणे आणले आहे. कांद्याच्या रोपाप्रमाणे दिसणारे केशरचं बियाणं वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकदा लागवड केल्यानंतर पुढील पाच ते सात वर्षे त्यापासून अनेक रोप तयार होतात. दिव्या यांच्या माहितीनुसार देशाला दरवर्षी जेवढी केशरची गरज आहे, त्या तुलनेत केवळ २० टक्के उत्पादनच आपल्या देशात घेतलं जातं. उर्वरित केसर हे बाहेरून मागवावं लागतं. मात्र, आता एरोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने घरातल्या घरातच शंभर टक्के शुद्ध केशरची लागवड केली जाऊ शकते. ज्यातून लाखो रुपायांचा नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो. या तंत्रज्ञानाबद्दल विदर्भातील प्रयोगशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारीही दिव्या आणि अक्षयची आहे.

Web Title: young couple from nagpur flourished a saffron farm at home in 4 by 4 closed room and earns 8 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.