नागपुरात तरुण डॉक्टरवर भर रस्त्यावर गुंडांचा हल्ला; पोलिसांच्या हलगर्जीमुळे गुंडांच्या हिंमतीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 23:10 IST2025-02-03T23:08:59+5:302025-02-03T23:10:02+5:30
डॉक्टरवर भर रस्त्यावर गुंडांनी गाडी हळू चालविण्याच्या कारणावरून हल्ला करत बेदम मारहाण केली.

नागपुरात तरुण डॉक्टरवर भर रस्त्यावर गुंडांचा हल्ला; पोलिसांच्या हलगर्जीमुळे गुंडांच्या हिंमतीत वाढ
नागपूर : उपराजधानीत रस्त्यावर वाहन चालविणेदेखील सुरक्षित राहिलेले नसून गुंडाकडून वाट्टेल तेथे मनमानी सुरू आहे. शहरातील या स्थितीचा एका तरुण डॉक्टरलादेखील फटका बसला. संबंधित तरुण डॉक्टरवर भर रस्त्यावर गुंडांनी गाडी हळू चालविण्याच्या कारणावरून हल्ला करत बेदम मारहाण केली. गोकुळपेठेतील मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे की नाही असाच संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
गोकुळपेठ येथील रहिवासी २९ वर्षीय नृपाल दंदे हे रवी नगर येथील दंदे रुग्णालयात डॉक्टर आहेत. रविवार २ फेब्रुवारी रोजी ते त्यांच्या दुचाकीने दुपारी १२ वाजता एटीएमकडे निघाले होते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करत ते हळू वेगाने जात होते. मागून दोन दुचाकी आल्या व त्यावरील तरुणांनी दंदे यांना शिवीगाळ करत ‘गार्डनमध्ये फिरत आहे का’ अशी विचारणा केली. दंदे यांनी शिवीगाळ का करता असे म्हटल्यावर त्यांना आरोपींनी अडविले व एकाने मी सतिश उर्फ नब्बू धवल आहे असे म्हणत मारहाण सुरू केली. त्याच्या साथीदारांनीदेखील दंदे यांना बेदम मारहाण केली. यात दंदे गंभीर जखमी झाले. तुझ्या कुटुंबाला जीवे मारेन अशी धवनने धमकी दिली. त्यानंतर आरोपी फरार झाले. दंदे यांना इस्पितळात नेण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धवनसह अनिकेत फातोडे, तालू उर्फ विक्की ज्ञानराज कटारे व ऋषभ चंदन मेहरोलिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. धवन वगळता इतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या अभयामुळेच वाढते हिंमत
धवन व त्याचा भाऊ डब्बू हे कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हफ्तावसुली करतात. पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे.