स्विमिंग पुलमध्ये बुडून तरुण डॉक्टरचा मृत्यू, कळमेश्वर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:45 PM2023-06-01T13:45:45+5:302023-06-01T13:46:46+5:30
तीन वर्षे बंद असलेल्या या जलतरण केंद्राचा मार्च महिन्यातच प्रारंभ करण्यात आला होता.
कळमेश्वर (नागपूर) : नगर परिषदेच्या जलतरण केंद्रात पोहत असताना डॉ. राकेश दुधे (वय ४१, रा. कळमेश्वर) यांचा मृत्यू झाला. बुधवारी, ३१ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
डॉ. राकेश दुधे यांचे कळमेश्वर स्टेशन रोडवर श्री हॉस्पिटल आहे. ते नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळच्या सुमारास कळमेश्वर नगरपरिषदेच्या जलतरण केंद्रात पोहायला आले होते. पोहताना अंदाज न आल्याने ते झटपटत असताना त्यांच्या मदतीला केंद्रातील प्रशिक्षक धावून गेले. प्रशिक्षकांनी डॉ. दुधे यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले आणि नजीकच्या कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे दुधे यांना मृत घोषित करणयात आले.
तीन वर्षे बंद असलेल्या या जलतरण केंद्राचा मार्च महिन्यातच प्रारंभ करण्यात आला होता. केंद्राच्या देखरेखीची जबाबदारी साई अक्वाटेक कन्सल्टन्सी, नागपूर यांच्याकडे आहे. या केंद्रावर तीनशे सदस्यांनी नोंदणी केली असून, त्यांच्यासाठी दोन प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात तरुण डॉक्टरच्या मृत्यूची बातमी पसरताच असंख्य नागरिकांनी जलतरण केंद्राकडे धाव घेतली. कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पंचनामा केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जलतरण केंद्रात पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता कुठल्याही सोयी-सुविधा नाहीत. येथील कंत्राटदार पैसे घेऊनही सुविधा उपलब्ध करू न शकल्याने तरुण डॉक्टरचा बळी गेला आहे. पालिकेने जलतरण केंद्राचे कंत्राट रद्द करून कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
- प्रशांत ईखार, महामंत्री, शहर भाजप